कारंजा : गेल्या आठवड्यात,संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्व व पश्चिम विदर्भात तसेच वाशिम यवतमाळ जिल्ह्यात सततधार ते अतिवृष्टी- ढगफुटी आदी प्रकारात पाऊस सुरूच असून,रविवार,दि. 23 जुलै रोजी दिवसा पावसाने पूर्णपणे उघड दिली.मात्र सायंकाळी पाच वाजता ग्राम रुईगोस्ता,मानोरा तालुका तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला असून, उशिरा रात्री तसेच सोमवार दि. 24 जुलै रोजी पूर्व विदर्भात चंद्रपूर तसेच यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सततधार पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी दूरध्वनीवरून बोलतांना सांगीतले असून, दि 24 जुलैच्या रात्री मात्र उघाड राहणार असल्याचे सांगीतले आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे काही भविष्यवेत्त्याकडून यावर्षी अल निनोची भिती दाखविण्यात आल्यामुळे बळीराजा सांशक होऊन दुष्काळाची भिती बाळगत होता.तसेच नागरिकही येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार काय ? या भययुक्त विचारात होते.मात्र अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तिंच्या म्हणण्यानुसार, ज्या ज्या वर्षी पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना असतो.त्या त्या वर्षी पाऊसमान चांगले राहून सुबत्ता नांदत असते.सध्या पावसाचे पुष्य नक्षत्र सुरू असून त्याचे वाहन बेडूक आहे. त्यामुळे सुद्धा जुलै महीना अखेरपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून,काही भागात होत असलेल्या सततधार पाऊसाने मात्र,बळीराजाची चिंताच वाढविली असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.