लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, या उद्देशाने शहरात जनजागृती करण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्याचे प्रशिक्षण प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसाठी जिल्हा कार्यालय व उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी अजित कुंभार, उपजिल्हाधिकारी (महसुल) तथा निवडणुक अधिकारी श्रीमती ए. एस. भालेराव 30 अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ यांच्या मार्गदर्शनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध करून देत प्रात्यक्षिक केंद्रेही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मतदारांना मतदान यंत्रांची प्रक्रिया स्वतः बघावी.
प्रारूप मतदान करून त्यांनी केलेले मतदान व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे पडताळून बघता यावे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत सर्व शंकाचे निरसन करता यावे, या उद्देशाने मतदान यंत्र मोबाईल व्हॅन शहरात फिरून जनजागृती करण्यात येत आहे. त्याच भाग म्हणून शासकीय वैद्यकीय येथे जनजागृती करण्यासाठी ही टीम पोहचली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोज तालापल्लवीवार, दिनेश सोनोने, हितेश राऊत, किशोर चतरकर, बालाणी रणेर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपाल सोनटक्के, चंद्रशेखर वासनिक, संजय पाचपोर, संतोष वाघमारे यांनी नागरीकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची परिचालन प्रक्रिया स्वत: बघून प्रारुप मतदान करण्यासंदर्भात उचित प्रशिक्षण देऊन नागरिकांच्या शंका, निशंका व संभ्रम यांचे निरसन केले. यावेळी पोलीस हेड कांस्टेबल अनिल अहेरवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नागरिकानी जनजागृती मोबाईल व्हॅनच्या माध्यमातुन प्रारूप मतदान तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत असणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.