चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावाकडे पार्थिव घेवून जाणार्या स्कॉर्पिओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी तालुक्यातील जानाळालगतच्या नर्सरीजवळ घडली.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओमध्ये चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते.
चंद्रपूरलगतच्या पडोली-लखमापूर परिसरातील Scorpio accident कोल डेपोमध्ये काम करणारे केशवराम यादव (60) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. छत्तीसगडमधील मानकापूर जिल्ह्यातील बोहरमभेडी येथील मूळ रहिवासी असल्याने मृतक केशवराम यादव यांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता त्यांच्या मूळ गावी घेवून जाण्यासाठी त्यांचे नातेवाईक छगनलाल साहु व इतर दोघेजण स्कॉर्पीओ (एचएच-34-बीएफ 0050) ने 29 ऑगस्टला सकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान लखमापूर येथून छत्तीसगडकडे रवाना झाले. दरम्यान सकाळी 9.50 वाजताच्या दरम्यान मूलपासून चंद्रपूर मार्गावरील 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या जानाळालगतच्या नर्सरीजवळ स्कॉर्पीओ चालक अश्वजित रूपचंद सहारे (26, रा. दुर्गापूर)) यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गावरील पुलाच्या कठड्याला स्कॉर्पीओने धडक दिली.
अपघातग्रस्त वाहन भरधाव वेगात असल्याने वाहनाच्या धडकेने पुलाचा कठडा तुटून मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी मोरगांव तालुक्यातील बुटाई येथील रहिवासी असलेले सचिन मोहन साखरे (32) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक सचिन साखरे हा स्कॉर्पीओ चालक अश्वजित सहारे याचा नातेवाईक असून, पार्थिव पोहोचवून परत येताना सोबतीला एक जण असावा म्हणून स्कॉर्पीओ चालकाने त्याला सोबत घेतले होते. अपघातामध्ये छगनलाल साहु (60) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले. इतर दोघे किरकोळ जखमी झाले असून, ते सुखरूप आहेत. घटनेची माहिती होताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी आणि मृतकाला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलिस करीत आहेत.