कारंजा : तांडा, वस्ती, वाड्यांवरील, ग्रामीण भागाच्या खेड्यापाडयातील जिल्हा परिषद शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशा निर्णयाने ग्रामीण भागात राहणाऱ्या तळागाळातील दारिद्रय रेषेखालील, भटक्या विमुक्त बहुजन समाजावर फार मोठा अन्याय अत्याचार होणार आहे . आधीच ग्रामिण शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना आपल्या संसाराचे राहाट गाडगे कसे चालवावे ही विवंचना आहे आणि त्यात मूठभर धनिकांच्या आणि राजकिय नेत्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थाचे लालन पालन करण्याकरीता शासन जर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा बंद करून त्याचे खाजगी करण करीत असेल तर लाखो रुपये डोनेशन देऊन आपल्या मुलामुलींना खाजगी शाळेत कसे शिकवावे ? की त्यांना शाळा विद्यालयापासून वंचित ठेवून निरक्षर ठेवावे ? असे कितीतरी प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतात त्यामुळे शासनाच्या खाजगीकरणाचा प्रत्येक ग्रामस्थ आणि तळागाळातील शेतमजूरांनी विरोध करून तिव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. व ह्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेने सावध होणे गरजेचे असल्याचे मत समाजसेवी संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.