मुंबई : जेवणाच्या कारणावरून आईला मारहाण करत असलेल्या ५२ वर्षीय बापाची मुलाने हत्या केल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी भादवी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून अशोक शिवशरण याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (The father has died after beaten up by his son)
पवईच्या महात्मा फुलेनगर आयआयटी परिसरात शिवशरण कुटुंब वास्तव्याला होते. अटकेत असलेले शिवशरण हे व्यसनी होते. दरम्यान १२ जून रोजी रात्री ११ वाजता दारूच्या नशेत असलेल्या चिदानंद शिवकरण यांनी पत्नीला जेवणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते आपल्या पत्नीला मारहाण करण्यास धावले. याच वेळी आईवर धावून गेलेल्या वडिलांना अशोकने पकडून मारहाण केली.
या मारहाणीनंतर काही वेळाने भांडण शांत झाले. त्यानंतर अशोक हे झोपी गेले. मात्र मारहाणीत लागलेल्या मुक्यामाराने अंतस्राव झाल्याने चिदानंद शिवकरण यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय चिदानंद यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. चिदानंद यांना डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हा मृत्यू प्रथमदर्शी नैसर्गिक असल्याचे सर्वांना वाटले. मात्र, शवविच्छेदन अहवाल आला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. याचे कारण म्हणजे मुलाच्या मारहाणीत चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. यानंतर पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चिदानंद यांचा पुत्र अशोक याला अटक करण्यात आली आहे.