वडिलोपार्जित जमिनीची मोजणी करून देण्यासाठी सात हजारांची लाच मागणे एका भू- करमापकाच्या अंगलट आले. गुन्हा नोंदवून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही कारवाई आरमोरी येथे करण्यात आली.
खुशाल मुखरुजी राखडे (वय ३९) असे त्या भूकरमापकाचे नाव आहे. तो आरमोरी येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदाराच्या वडिलांना त्यांची वडिलोपार्जित जमीन मोजणी करून त्यातील एक हेक्टर जमीन मॅचअप करून "क" शीट तयार करून देण्यासाठी भूकरमापक खुशाल राखडे याने सात हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, मागणी सिद्ध झाल्याने खुशाल राखडेविरोधात आरमोरी ठाण्यात २६ जूनला गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली.उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शिवाजी राठोड, श्रीधर भोसले, हवालदार नथ्थू धोटे, पो. ना. राजू पद्मगिरीवार, किशोर जौंजारकर, स्वप्निल बांबोळे, अंमलदार किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, अनिल अंगडवार यांनी ही कारवाई केली.