हिवताप या शब्दाचा अर्थ हिवताप या शब्दातच दडलेला आहे. डास चावल्यामुळे थंडी वाजून येणारा ताप. म्हणजेच हिवताप, मलेरिया, शीतज्वर. मी मोहन वाटगुरे आरोग्य कर्मचारी (MPW) उपकेंद्र- चुडावा,प्रा.आ.केंद्र- कावलगाव,ता.पूर्णा, जि.परभणी येथे 2021 पासून कार्यरत आहे. माझा मूळ जिल्हा गडचिरोली आहे. मी माझ्या परीने माझ्या उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या चारही गावांमध्ये हिवताप (मलेरिया) या आजाराची जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे.हिवताप विषयी लेख लिहिण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे हिवतापाची जनजागृती करणे हा आहे.थोडक्यात आपण हिवताप आजाराचे स्वरूप बघूयात.
हिवताप(मलेरिया):-
हिवताप (मलेरिया) हा आजार प्लाझमोडियम प्रकारच्या परोपजीवी जंतू मुळे होतो. सर रोनाल्ड रॉस यांनी या परजीवी जंतू चा शोध लावला आहे.त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले म्हणून त्यांना हिवतापाचे जनक असे म्हटले जाते. हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस प्रकारच्या मादी डास चावल्याने होतो.डासांपासून प्रसारित होणारे आजार जास्त असतात पावसाळा सुरू झाला की किटकजन्य आजार जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डासांपासून होणारे धोके मोठे असतात,म्हणून म्हणतात -
"डंख छोटा,धोका मोठा."
डासांपासून होणारे आजार म्हणजेच किटकजन्य आजार त्यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया,हत्तीरोग,जापानीज मेंदूज्वर (JE) हे आहेत.
25 एप्रिल 2025 चे जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य/संदेश:-
जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.म्हणून हा दिवस जगभरात जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी पुढील प्रमाणे घोषवाक्य संदेश दिला आहे.“Malaria Ends with Us: Reinvest,Reimagine, Reignite." म्हणजेच “मलेरिया आमच्यासोबत संपतो:पुन्हा गुंतवणूक करा, पुन्हा कल्पना करा,पुन्हा प्रज्वलित करा.”* हे घोषवाक्य दिलेले आहे.
वरील प्रकारचा संदेश देऊन,हिवताप मुक्त करण्याचा उद्देश जागतिक आरोग्य संघटनेचा आहे.हिवताप हा आजार किती धोकादायक आहे हे सर्वांच्या लक्षात आणून देण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा प्रयत्न आहे.
हिवताप किंवा इतर किटकजन्य आजारामध्ये रुग्णाला वेळीच औषध उपचार न मिळाल्यास प्रसंगी तो रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार कसा होतो ते पुढील प्रमाणे: -
हिवतापाचा प्रसार कसा होतो: -
हिवतापाचा प्रसार रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीस ॲनाफिलीस प्रकारच्या मादी डासाने चावल्यानंतर होतो. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. डास हे आपल्याला उडताना, चावा घेताना दिसतात. चावल्यानंतर ते मानवाचे रक्त शोषून घेतात. मात्र डासांचे मुख्य अन्न हे मानवाचे रक्त नसून त्यांना अंडी घालण्यासाठी मानवाच्या रक्तातील प्रथिनांची गरज असते. म्हणून ते आपल्याला चावत असतात. डासांच्या प्रकारानुसार त्यांच्या अंडी घालण्याचे ठिकाण, चावण्याची वेळ, फिरण्याची वेळ, वेगवेगळी असते. म्हणून त्यांच्यावर नियंत्रण करणे शक्य होत नाही. गावामध्ये घरातील हौद,टाकी, माठ यामध्ये पाणी अयोग्य पद्धतीने साठवले जाते. नदी,नाले,गटारे, नाली,टायर्स, भंगार यामध्ये साठणाऱ्या पाण्यामध्ये डासाचे प्रमाण जास्त दिसून येतात.त्यामुळे किटकजन्य आजार होताना दिसतात.
डासांचा जीवनचक्र:-
अंडी ➡️ अळी ➡️ कोष ➡️ पूर्ण डास.
हिवतापाची लक्षणे: -
1) तीव्र ताप येणे.
2) थंडी वाजणे.
3) डोके दुखणे.
4) मळमळ होणे,उलट्या होणे.
5) हुडहुडी भरणे.
6) घाम येणे.
वरीलपैकी कुठलाही लक्षण आढळून आल्यास हिवताप असू शकतो. म्हणून जवळच्या सरकारी दवाखाना किंवा आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत रक्त नमुना तपासून निदान करून घ्यायला पाहिजे.
"येता कण कण तापाची, करा तपासणी रक्ताची."
हिवताप जंतूचे प्रकार:-
प्रामुख्याने हिवताप जंतूचे प्रकार चार आहेत.
1) प्लाझमोडियम व्हायवॅक्स. (PV)
2) प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम.(PF)
3) प्लाझमोडियम मलेरीई.
4) प्लाझमोडियम ओव्हेल.
महाराष्ट्रामध्ये हिवताप जंतूचे प्लाझमोडियम व्हायवॅक्स (PV), प्लाझमोडियम फॅल्सीपॅरम(PF) हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. मलेरियाच्या जंतूचा अधिशयन काळ 10 ते 12 दिवसाचा आहे.
हिवतापावर औषधोपचार:-
हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास, आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या आरोग्य उपकेंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्त नमुना तपासून घ्यावा. आणि जर रक्त नमुना दूषित आढळून आल्यास, त्या हिवताप दूषित रुग्णाला क्लोरोक्वीन, प्रायमाक्विन व ए.सी.टी.चे मोफत औषधोपचार सुरू करण्यात येते. हिवताप जंतूच्या प्रकारानुसार औषधोपचार दिला जातो. हिवताप दूषित रुग्णाने जर समूळ उपचार घेतला नाही,तर ते प्राणघातक ठरू शकते, आणि तो रुग्ण हिवताप प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून औषधोपचार पूर्ण घेणे गरजेचे आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना:-
प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच उपचारापेक्षा प्रभावी ठरत असते. म्हणून डासांवर नियंत्रण ठेवणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना पुढीलप्रमाणे:-
1) गृहभेटी दरम्यान कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून डासांची घनता काढून,ॲबेटिंग करणे हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
2) डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. गावांमधील कायमस्वरूपी व तात्पुरते स्वरूपाचे डासोत्पत्ती स्थाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून नष्ट करणे व नाली वाहती करणे.
3) कोरडा दिवस पाळणे हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. आठवड्यातून पाणी साठवण्याची भांडी रिकामी करून घासून,पुसून,कोरडी करावी.
"कोरडा दिवस पाळा, किटकजन्य आजार टाळा."
4) डास अळी भक्षक गप्पी मासे गावातील पाण्याच्या साठ्यामध्ये जसे,तलाव,डबके ओढा यामध्ये सोडण्यात यावे.हा अत्यंत महत्त्वाचा डास नियंत्रणासाठी जैविक प्रतिबंधात्मक उपाय आहे.
"गप्पी मासे पाळा,हिवताप डेंग्यू टा
ळा."
5)ॲबेटिंग, कीटकनाशक फवारणी,धूर फवारणी करणे यामुळे डासांची घनता कमी होण्यास मदत होते.
6) कीटकनाशक भारित मच्छरदानीचा वापर रात्री झोपताना करावा,पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे व डास प्रतिबंधात्मक क्रीम वापरावी.
7) घरातील रांजण,माठ, टाकी, हौद यांना घट्ट झाकण किंवा झाकण नसल्यास कापड बांधावे तसेच कुंड्या, टायर्स, कुलर, फ्रिज व अन्य वस्तूमध्ये जास्त काळ पाणी साचून राहणार नाही,याची दक्षता घ्यावी.
8) लोकांना डासाचे जीवन चक्र माहित असणे खूप महत्त्वाचे आहे.कारण डास कसा तयार होतो आणि डासाची उत्पत्ती कशी होते,हे जर माहीत झाल्यास लोक डास नियंत्रणासाठी उपाययोजना करतील.
9) गावांमध्ये व शाळेमध्ये डास निर्मूलनाची शपथ घेऊन डासाचे गांभीर्य जनतेपर्यंत पोहोचवणे.
10)आरोग्य शिक्षण देणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामध्ये हिवतापाची जनजागृती करणे,शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून हिवताप जनजागृती रॅली काढणे, भिंतीवर म्हणी, सार्वजनिक ठिकाणी हिवतापाविषयी माहिती देणे,अशा प्रकारे हिवतापा बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून सहज शक्य होते व हिवताप प्रतिबंध किंवा डासास प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते.
सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय मार्फत हिवताप व किटकजन्य आजारावर नियंत्रण करण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जातात. डासांवर नियंत्रण करण्यासाठी किंवा हिवताप आजार नष्ट करण्यासाठी गावातील नागरिकांचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करून डास निर्मूलन करण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून आपल्या गावात किटकजन्य आजार होणार नाहीत.म्हणजेच आपला गाव हिवताप मुक्त किंवा किटकजन्य आजार मुक्त गाव राहील. भारत सरकारने 2030 पर्यंत हिवतापाचे पूर्ण उच्चाटन करण्याच्या ध्येयावर ठाम आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी स्वतःपासून सुरुवात केली तर निश्चितच आपण भारताला मलेरिया मुक्त भारत म्हणून घोषित करू शकतो.
अश्याप्रकारे डॉ.आर.एम.सोनवणे जिल्हा हिवताप अधिकारी ,जिल्हा हिवताप कार्यालय परभणी. डॉ.व्ही.आर.पाटील तालुका आरोग्य अधिकारी*,पूर्णा. डॉ.सुरेश गिनगीने वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र- कावलगाव. श्री. टि.एस. इनामदार आरोग्य निरीक्षक* प्रा.आ.केंद्र- कावलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिनी हिवताप विषयी लेख लिहून माहिती देण्यात येत आहे.
संकलन:-
श्री.मोहन रामदास वाटगुरे
आरोग्य कर्मचारी (MPW), उपकेंद्र-चुडावा
प्रा.आ.केंद्र-कावलगाव,
ता.पूर्णा,जिल्हा हिवताप कार्यालय-परभणी.
मो.नं.7498036700
आपल्या प्रतिक्रिया द्या....