भिसी येथून 7 किमी अंतरावर असलेल्या वाढोणावासीयांनी वारंवार मागणी करूनही महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेपासून हे गाव अजुनही वंचित असल्यामुळे नागरिकांना असुविधा निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. भारताने मजल दरमजल करत प्रगती साधली. शहराबरोबरच काही प्रमाणात खेड्यापाड्यातही विकास पोहोचला. प्रामुख्याने रस्ते व पाणी समस्या बऱ्याच प्रमाणात दूर झाल्या. यांत्रिक साधने वाहनांची भरभराट झाली. गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी या संकल्पनेनुसार परिवाहन मंडळाची बस सुद्धा गाव खेड्यात जाऊ लागली. आत असलेल्या गावांना फाटा थांबा देऊन सुविधा दिली जात आहे.
मात्र अजुनही काही गावे अशी आहेत, त्या गावांना एसटीचे दर्शनच झालेले नाही. यापैकीच चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर चिमूर विधानसभेतील साडेचारशे लोकसंख्येचे जंगलव्याप्त वाढोणा गाव होय. येथील अनेक लोक दुग्ध व्यवसायात असून दुध-शेतमाल विक्री, दैनंदिन खेरदी व आरोग्य, बँक शिक्षण अशा अनेक कामांसाठी भिसी गावाला यावे लागते. त्यामुळे अनेकांन रोज प्रवास करावा लागतो. काही लोकांकडे दुचाकी वाहन असल्याने त्यांना फारशी अडचण भासत नाही. परंतु, इतरांना व महिलांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो.