कारंजा : वंदनिय राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन, आपले संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ किर्तन प्रवचन आदी समाजप्रबोधनाकरीता घालवीत, हजारो व्यसनाधिनांना व्यसनमुक्त करीत,त्यांचे सांसारीक जीवन सुखी करणार्या तसेच कारंजेकर शिष्य मंडळींच्या गळ्यातील ताईत असणार्या,व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे हे मागील पंधरवाड्यात रामेश्वरम् येथून तिर्थाटन करून, नागपूर येथून आपले वाहन असलेल्या कार क्र. एम एच 29 वाय 1555 या गाडीने परत येत असतांना, यवतमाळ आर्वी राष्ट्रीय महामार्गावर अचानकपणे उड्डाणपुलावरील दुभाजकाला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्या वाहनाने दोन तिन पलट्या घेतल्या.
यावेळी त्यांच्या वाहनात त्यांच्या पत्नी बेबीबाई, मुलगा ओम,स्नुषा संजीवनी व नातवंडे आदी परिवार होता. परंतु क्षणभरात झालेल्या या अपघातातून गाडीच्या काचा फोडून इतरांची मदत मिळण्यापूर्वीच, खोडे महाराज स्वतः एकटे बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी कुटूंबाला बाहेर काढले.यावेळी सर्वजण सुखरूप वाचले असून केवळ त्यांच्या पत्नी बेबीताई यांच्या खांद्याला व कमरेजवळ किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी कळवीले होते. व तुर्तास भेटीला येऊ नका असे सुद्धा सुचवले होते.त्यांचा सुखरूप समाचार कळाल्यामुळे कारंजेकरांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु आज दि. १ फेब्रुवारी माघी जया एकादशी निमित्त, त्यांच्या मार्गदर्शनाने कारंजा (लाड) येथील दारुबंदी व व्यसनमुक्तीचे प्रचार कार्य करणारे शिष्यमंडळी त्यांचे पट्टशिष्य व्यसनमुक्ती प्रचारक दिलीप गिल्डा, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दारुबंदी व्यसनमुक्तीचे समाज प्रबोधनकार लोककलावंत संजय कडोळे, हभप.शांताबाई गरड तथा व्यसनमुक्ती कार्यकर्ते डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी दिग्रस येथे व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. यावेळी महाराजांचे संपूर्ण कुटूंब भावनिक झाले होते. महाराजांनी आपल्या शिष्य मंडळीना बघून आनंद व्यक्त करीत म्हटले- "माझ्या आयुष्याची खरी कमाई म्हणजे मी व्यसनमुक्त केलेली माणसं. त्यांचे जोडलेले संसार आणि घडवलेली शिष्यमंडळी होय. त्यांचे आशिर्वाद व शुभेच्छांनी आम्हाला या संकटामधून वाचवीले आहे."
याविषयी अधिक बोलतांना संजय कडोळे म्हणाले, "सत्कर्म करीत समाजाची सेवा प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तीच्या सुखंदु:खात त्यांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर राहून त्याला संकटातून सहीसलामत वाचवीत असतो.हे या घटनेने सिध्द झाले आहे. तेव्हा मनुष्याने नेहमी सत्कर्म करीत राहीलं पाहीजे." याप्रसंगी डॉ ज्ञानेश्वर गरड, दिलीप गिल्डा, संजय कडोळे यांनी महाराजांना, कारंजा नगरीचे आद्यदैवत आई श्री एकविरा मातेची प्रतिमा भेट दिली. तसेच महाशिवरात्री निमित्त शेलुवाडा येथील संगीतमय शिवपुराण कथेची माहिती देऊन, महाराजांना सस्नेह निमंत्रण दिले. तसेच याप्रसंगी महाराजांचे हस्ते माहिती पत्रकाचे विमोचन सुद्धा करण्यात आले. दिलीपजी गिल्डा यांनी दिलेल्या संजय कडोळे यांच्या निःस्वार्थ कार्याची माहिती जाणून घेत महाराजांनी श्रीफळ देऊन संजय कडोळे यांना शुभाशिर्वाद दिले.