भाद्रपद अनंत चतुर्दशी शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी, कारंजेकरांकडून, बाप्पाला निरोप देतांना भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी कारंजा शहरात ४४ सार्वजनिक गणेश मंडळाची नोंदणी झाली होती . त्यापैकी १८ ते २० लहान मोठ्या मंडळाचे बाप्पा मिरवणूकीत सहभागी झाले होते. बाप्पांना निरोप देतांना काही मंडळाचे लेझिम पथके, महिलामंडळ सहभागी झाले होते तर इतर मंडळाचे युवक आधुनिक संगीताच्या तालावर थिरकताना दिसत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी जगादिश पांडे यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनात कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवलेला होता. यावेळी पोलीस विभागाकडून प्रत्येक चौकात आणि विसर्जन मार्गात सिसिटिव्ही, ड्रोन व व्हिडीओ कॅमेर्याद्वारे चित्रीकरण सुरु होते. आणि मंडळाच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर दिसून येत होती. गेल्या दोन वर्षात कोरोना संचारबंदीमुळे नागरिकांना श्री गणेशोत्सवाचा आनंद घेता आलेला नव्हता . त्यामुळे या वर्षी मात्र उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत होते . गणेश मंडळाच्या उत्साहात शहरातील उत्साही नेते मंडळी तथा आजी माजी नगरसेवकही सहभागी झालेले होते. शिवाय सर्वधर्मिय सामाजिक कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार मंडळी सुद्धा शांतता व सलोखा कायम राखण्याच्या दृष्टिने सहकार्य करीत होते. कारंजा महसूल विभागाचे तहसिलदार धिरज मांजरे, निवासी नायब तहसिलदार विलास जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, तलाठी अमोल वक्ते, तलाठी धानोरकर इ . अधिकारी नगीना मस्जीद जवळ थांबून परिस्थितीचा अहवाल घेत होते. तसेच कारंजेकर सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी मंडळी यांनी बाप्पांच्या मिरवणुकीत सहभागी मंडळे आणि प्रेक्षकाकरीता, अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केलेली होती. शहरातील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बिसुभाई पहेलवान, जहिरभाई इत्यादी कडून प्रत्येक श्रीगणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत होता. शांतता कमेटीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, संदेश जिंतुरकर, राजिक शेख, रामबकस डेंडूळे, संजय कडोळे,पोलिसपाटील तथा पत्रकार गोपाल पाटील भोयर,इत्यादी शांती सलोखा बंधुभाव एकात्मतेचा संदेश देत गणेशमंडळांना शुभेच्छा देत होते. अतिशय आनंद, उत्साह,शांतता संयम व शिस्तीच्या वातावरणात श्री गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक पार पाडण्यात येत असल्याचे वृत्त, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.