वाशिम : गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,नालंदानगर, वाशिम या वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता रिक्त असलेल्या जागी जातीनिहाय असलेल्या आरक्षणानुसार गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे व त्यासाठी प्रवेश अर्ज वाटप करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2023 आहे. कार्यालयीन वेळेत प्रवेश अर्ज सादर करावे. रिक्त असलेल्या जागेतून अनुसूचित जाती - 32,अनुसूचित जमाती - 1, इतर मागासवर्ग - 4, विमुक्त जाती भटक्या जमाती - 3, विशेष मागासवर्ग - 2, दिव्यांग -1 आणि अनाथ - 1 अशा एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.विद्यार्थी किमान 75 टक्के गुण मिळवून जून 2023 मध्येच इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा. एकूण मान्य संख्या 100 त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 80 टक्के, इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी प्रत्येकी 5 टक्के, अनुसूचित जातीसाठी 3 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के, अपंगासाठी 3 टक्के आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 2 टक्के राहील. विद्यार्थी हा वाशिम शहरातील महाविद्यालयात इयत्ता 11 वी किंवा पॉलिटेक्निक किंवा आयटीआयच्या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षात प्रवेशित असावा. तसेच तो जून 2023 मध्येच इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीसाठी 2 लक्ष रुपये आणि इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गासाठी 1 लक्ष रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे.