मुर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या तुरखेड येथे,नवदुर्गा नवरात्रोत्सवा निमित्त,जय भवानी जय मल्हार गोंधळी कला मंच तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष,राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांच्या गोंधळ जागरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यावेळी गोंधळ जागरणाच्या आख्यानातून बोलतांना,लोककलावंत संजय कडोळे म्हणाले, "आज आपण वृत्तपत्र उघडले की,एकतरी स्त्री अत्याचाराची बातमी वाचनात येते.ह्या घटना थांबायला हव्यात.आपल्या देशात स्त्रीयांवरील अत्याचार वाढलेले आहेत.घरोघरी त्यांचा छळ होतो आहे.स्त्रीया घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेरही सुरक्षित नाहीत.
हे चित्र बदलायला हवे.आपल्या देशाला भारतमाता म्हणून आपण ओळखतो. भारतीय नागरीक मातृशक्ती उपासक असून,नवरात्री निमित्ताने दुर्गा,काली,चंडी,शारदा,लक्ष्मी रूपाने आपण श्रध्देने त्यांची पूजा करतो.त्यामुळे आपण प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी माता,बहीण, मुलगी आहे ह्याची जाण ठेवून, स्त्रीयामध्ये आपली कुलस्वामिनी, आपली आई,बहिण पाहून त्यांचे संरक्षणार्थ पुढे येऊन, स्त्रीयावरील अत्याचार थांबविले पाहिजेत." सदर कार्यक्रमाला संजय कडोळे यांना,कमलेश कडोळे,गोपाल मुदगल यांनी साथसंगत दिली.