उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा खून झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बल्लारपूर शहरातील विद्यानगर वॉर्ड येथील पंचशील चौकात सोमवारी (दि.६) रात्री ११ च्या सुमारास घडली.
ललित तोडसाम (वय 37, रा.पंचशील चौक, विद्यानगर वार्ड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने आरोपी शितल रितीक गवईला काही दिवसापूर्वी उसनवारीने पैसे दिले होते. परंतु, त्याने दिलेल्या वेळेत पैसे परत केले नाही. त्यामुळे दोघांत भांडण झाले. भांडणाचे रुपांतर खूनात झाले. शितलचा पती रितीक गवई याने पैसे मागितले म्हणून अश्लील शिवीगाळ करीत झटापट केली. यावेळी तेथे आलेल्या पाच जणांनी काठी, दगड, सिमेंटच्या तुकड्यांनी मारामारी करण्यास सुरूवात केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ललित तोडसाम याचा मृत्यू झाला. तर अमोल देवगडे हा जखमी झाला. त्याच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
या खून प्रकरणात आरोपी रितीक भीमराव गवई (22), सौरभ खान हाजी अब्दुल सुभान खान (35), आशा भीमराव गवई (45), शितल रितीक गवई (20, सर्व रा. ग्रामीण रुग्णालयामागे, शांतीनगर, बालाजी वॉर्ड, बल्लारपूर), बंडू पांडुरंग नगराळे (47 रा. पंचशील चौक, विद्या नगर वॉर्ड, बल्लारपूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.