प्रश्नाचे निराकरण न झाल्यास देशात अराजकता माजेल, नेपाळची भारतातही पुनरावृत्ती?
शिक्षण सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी २००१ पासुन कार्यरत शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. त्यामुळे अनेक शिक्षक संभ्रमात आहेत, 'टीईटी' अनिवार्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर अनिश्चिततेचे सावट आहे. ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षे शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील. पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे, त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे सर्व शिक्षकांनी स्वागत केले आहे. दिलेल्या निर्णय हा योग्यच आहे; परंतु शिक्षकांना नेहमीच त्रास होत असणारे निर्णय शिक्षकांवरच का येऊन ठेफतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डीएड, डीएड अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा, नोकरीवर लागण्यासाठी टीईटी परीक्षा, नोकरीवर लागल्यानंतर आता पुन्हा परीक्षा, एवढेच नाही तर शाळेवर कार्यरत असताना शालेय प्रशिक्षण, नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, अद्यावत राहण्यासाठी चे प्रशिक्षण, शैक्षणिक धोरणासाठी प्रशिक्षण, एवढेच नाही तर जनगणना करण्यासाठी प्रशिक्षण, निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशिक्षण व अजून इतरही भरपूर प्रशिक्षण घेऊन शिक्षकांना अनेक शिक्षण व्यतिरिक्त विविध परीक्षा द्याव्या लागतात. परंतु ह्या सर्व परीक्षा फक्त शिक्षकांच्याच माथी का? असा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे, कारण देशांमध्ये फक्त शिक्षकच नोकरी करतो का? शिक्षकच पगार घेतो का? तर उत्तर नाही ना... मग अद्यावत राहण्यासाठी फक्त शिक्षकांनाच परीक्षा का? देशात बँक कर्मचारी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, शासकीय कार्यालयातील कर्मचारी आहेत, राजकीय क्षेत्रातील लोक आहेत, यांना अद्यावत करण्याची गरज नाही का? आधुनिक काळात आज प्रत्येकालाच अद्यावत ठेवण्याची गरज आहे. शिक्षकांबरोबर इतर क्षेत्रातील ही कर्मचाऱ्यांना अद्यावत होण्याची आवश्यकता आहे. मग प्रत्तेक कर्मचाऱ्यांना सुद्धा टीईटी परीक्षा का नसावी? सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल फक्त शिक्षकांच्याच माथी का मारावा? वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक आधुनिक तंत्र विकसित झाली आहेत; त्यांच्यासाठी टिईटि का नाही? बँक क्षेत्रामध्ये अनेक कर्मचारी वयोवृद्ध आहेत, अद्ययावत होण्यासाठी त्यांना सुद्धा टीईटीची गरज नाही का? शासकीय कार्यालयामधील कर्मचारी स्पर्धा परीक्षा होऊन नोकरीवर लागलीत परंतु आज त्यांना सुद्धा अद्ययावत होण्याची आवश्यकता नाही का? असे अनेक विविध क्षेत्रांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत; त्या सर्वांनाच आधुनिक काळामध्ये अद्ययावत होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये शुद्धिपत्रक काढून सर्वच कर्मचाऱ्यांसाठी टीईटी आवश्यक करावी, जेणेकरून भारतीय लोकशाहीमध्ये सर्वांना समान संधी समान न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालय असा निर्णय घेऊ शकत नसेल तर मग फक्त शिक्षकांवरच हा अन्याय का? यामध्ये २००९ पासून कायम विनाअनुदानित शाळेवर शिक्षक कार्यरत आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यातील १५ ते २० वर्ष मोफत सेवा दिली आहे. आज निदान त्यांना २० टक्के व ४० टक्के पगारावर काम करावे लागत आहे. अशा विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून लागण्यासाठी या शिक्षकांसाठी कोणतीही सीईटी, शिक्षण सेवक व कोणत्याही शासकिय सुविधा लागू करण्यात आल्या नाहीत, मग हा टीईटी देण्याचा निर्णय का लागू करावा? तसेच २००५ नंतर शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद केले आहे, त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा करावा? असे एक ना अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे निर्माण झाले आहेत.अशा प्रश्नाचे निराकरण न झाल्यास देशात अराजकता माजेल आणि नुकतेच भारत देशा जवळील असलेल्या नेपाळ देशामध्ये युवापीढीणे जो निर्णय घेतला त्याची भारतातही पुनरावृत्ती होईल का? अश्या गहन प्रश्नावर अभ्यासकांनी योग्य चर्चा व निर्णय करूनच देशभरातील सर्वच कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याची वेळ आली आहे.
चौकट :-
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल फक्त शिक्षकांच्याच माथी का मारावा? वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक आधुनिक तंत्र विकसित झाली आहेत; त्यांच्यासाठी टिईटि का नाही? बँक क्षेत्रामध्ये अनेक कर्मचारी वयोवृद्ध आहेत, अद्ययावत होण्यासाठी त्यांना सुद्धा टीईटीची गरज नाही का? शासकीय कार्यालयामधील कर्मचारी स्पर्धा परीक्षा होऊन नोकरीवर लागलीत परंतु आज त्यांना सुद्धा अद्ययावत होण्याची आवश्यकता नाही का? असे अनेक विविध क्षेत्रांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत; त्या सर्वांनाच आधुनिक काळामध्ये अद्ययावत होण्याची आवश्यकता आहे.
-लेखक : प्रा. प्रज्ञानंद थोरात
(पत्रकार व शिक्षक)
मो. ९८२२६७४४८७
आपल्या प्रतिक्रिया द्या....