कारंजा(लाड) : संपूर्ण कारंजा नगरीसह तालुक्यातील ग्रामीण भागात आषाढी एकादशीचा उत्साह भाविकात दिसून आला. ठिकठिकाणी स्थानिक श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीर आणि माऊली संत गजानन महाराज मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून येत होते. स्थानिक जुने श्रीविठ्ठल मंदिर कुंभारपूरा, लोकमान्य नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि टेलिफोन कॉलेनी स्थित श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिरातही दर्शनासाठी सकाळ पासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मंदीर परीसरात एकादशी फराळी व्यवस्था केल्या गेली होती. त्याचप्रमाणे दरवर्षी संत गजानन महाराज मंदिर ममता नगर कारंजा कडूनही ममतानगर ते श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर बायपास येथे, श्रीक्षेत्र शेगावच्या धर्तीवर वारकरी पेहरावात श्रींची पालखी काढण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार सईताई डहाके; सौ तेजस्वीनी डहाके यांनी श्रीं विठ्ठल रुख्मिनी मंदिरात पूजाअर्चना करून, श्रींच्या पालखीत डोक्यावर तुळस घेऊन आणि वारकरी भजनात सहभागी होऊन, आपल्या श्रध्देची प्रचिती देत पूर्ण वेळ हजेरी दिली शिवाय श्री विठ्ठल भक्तांना प्रसादाचे वाटप केले. या प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ शांतीनगर येथील भजनीमंडळासह शहरातील लाखो भाविकांनी श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला.पालखी पदयात्रा घेऊन आलेल्याचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्री विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिर समितीने शिस्तबध्द व्यवस्था केली होती. शिवाय श्री विठ्ठलरुख्मिणी दर्शन झाल्यानंतर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती तथा दरवर्षीच्या देणगी दात्यांचे सहयोगातून मंदीर परीसरात एकादशी निमित्त प्रसाद म्हणून व फराळ चहा पानाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती, वारकरी,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आमदार सईताई डहाके;कृ.उ.बाजार समितीचे व्यापारी अडते;कर्मचारी व भावीकांनी आपली सेवा विठ्ठल चरणी अर्पण केली.असे वृत्त दर्शनासाठी आलेले प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.