वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-२०२३ करीता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती १ जुलैपासून अद्यावत करण्याची सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कक्षेतील सर्व कर्मचाऱ्यांची माहितीकोषातील माहिती अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रफुल्ल पांडे यांनी केले आहे.
नियोजन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये भरण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, वाशिम यांचेकडून लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घ्यावा. माहितीकोषातील माहिती विहित वेळेत पार पाडायची आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांना जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दि.३१ ऑगस्टपर्यंत लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन दिल्या जाईल. दि. १सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने माहिती देणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच दि.१ डिसेंबर २०२३ ते दि.२८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने त्रुटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर २०२३ च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयक कोषागार कार्यालयात स्विकारली किंवा पारीत केल्या जाणार नाहीत. तसेच दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०२४ च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयक कोषागार कार्यालयात स्विकारली किंवा पारीत केली जाणार नाहीत. असे सांख्यिकी विभागाने कळविले आहे.