देशातल्या मालमत्तांची विकटाक आणि दुसऱ्या राज्यातील प्रकल्प पळवून गुजरात मालामाल आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांना कंगाल
करून,स्वतःचे मांडलिक बनविण्याचे षडयंत्र दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी परत सुरू केलेले आहे.यासाठीच काहीही करून सामदाम दंडभेदाच्या नीतिचा अवलंब करून महाराष्ट्राची सत्ता काबिज करण्याचं भाजपचं स्वप्न होतं.ते एकनाथ शिंदेंसारख्या घरभेदी नेत्यांच्या मदतीने मोदी शहांनी अगोदर पूर्ण केलं. त्यानंतरच वेदांत फॉक्सकॉनचा पहिला जोरदार झटका महाराष्ट्राला दाखविला आहे.
कुटूंबाचे पालनपोषण करणारा मुख्य पालक जर व्यसनांच्या आहारी जाऊन बाहेरख्याली झाला तर तो स्वत:च्या चैनीसाठी,शुल्लक स्वार्थासाठी घरातील द्रव्य इतरांवर उधळतो.कुटूंबाच्या वेदना वाढत त्यांची कितीही वाताहात झाली तरी चुकीच्या विघातक आणि अनैतिक लोकांशी मैत्री करत तो त्याच्या क्षणिक सुखांमध्ये लिप्त असतो.याचप्रमाणे सत्तेच्या अघोरी महत्वाकांक्षेसाठी स्वतःचे महाराष्ट्रात आणि इतरांचे केंद्रात बस्तान बसविण्याची राजकीय नशा राज्यातल्या राजकीय नेत्यांना चढलेली आहे.त्यामुळे विकटाक आणि पळवापळवीच्या संसर्गजण्य प्रवृत्तीची लागण त्यांना पण आता झालेली असल्याचे त्यांच्या वाटचालीतून निदर्शनास येत आहे.त्यामुळे राज्य कंगाल झाले तरी चालेल परंतू आमची सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद अबाधित राहून शिवसेना संपवता आली पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्राला डावावर लावणारा पहिला आघात शिंदे फडणविस युतीच्या सौजन्यशील सहकार्याने दिल्लीश्वरांनीच घडवून आणल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.कारण तब्बल २ लाख कोटींच्या गुंतवणूकीचा ३ लाख रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये पळवून येथील मलिद्यावर डल्ला मारण्याचा यशस्वी प्रयत्न मोदी शहा या गुजरातप्रेमी नेत्यांनी घडविण्याची संशयास्पद खेळी भाजपने केलेली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातले वातावरण सध्या तापलेले असून येथील जनतेचा घास पळविणाऱ्या अशा संधीसाधू राजकारण्यांच्या संमोहनातून आता राज्यातल्या भाजप नेत्यांसह, सुशिक्षित बेरोजगार,उद्योजक आणि जनतेनं धडा घेत आता सावध झालं पाहिजे.
शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या बंडखोर आमदारांच्या सत्तास्थानासाठीच जर राज्याला एवढी मोठी किंमत मोजावी लागत असेल, तर महाराष्ट्राच्या पेकाटात लाथ मारणाऱ्या अशा अनैतिक प्रवृत्तींना मदत करणे हेच हिंदुत्व आणि हिच महाराष्ट्रनिष्ठा आहे काय? आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी आपल्या अपयशाचे खापर आघाडी सरकारवर फोडले जाणार आहे का? ज्याला अपयशही म्हणता येणार नाही,फक्त मुख्यमंत्रीपद आणि सत्तेसाठी लाचारी पत्करून शेटजींना खूश ठेवण्यासाठी केलेली ही अनैतिक राजकीय सौदेबाजी म्हणावी लागेल.महाराष्ट्र आणि हिन्दुत्वाच्या अस्मितेचे ढोल बडवून केलेला हा व्यभिचार म्हणजे स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा आणि महाराष्ट्रातील जनतेची केलेली घोर फसवणूक म्हणावी लागेल.
महाराष्ट्राने काय गमावलं, कशामुळे गेलं आणि भविष्यात शेटजींच्या आदेशाने माना डोलविणारे अजूनही काय काय पळविणार याबाबत सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी नि:पक्षपातीपणे विचार केला पाहिजे.....चिंतन करून आगामी वाटचालीसाठी काय बदल केले पाहिजेत हा धडा या तडाख्यातून घेतला पाहिजे.नुसती सत्ता आणि खोक्याचे राजकारण करून आमचा प्रांत लुटण्यासाठी महाराष्ट्रात घुसणाऱ्यांसोबत मांडवली करणाऱ्या नेत्यांना वेळीच चपराक दिली पाहिजे. नाही तर देशात एकच गुजरात प्रांत समृध्द होत जाईल,आणि इतर राज्यांना कंगाल करून त्यांचेवर आर्थिक गुलमगीरी लादत अधिराज्य गाजवले जाईल.म्हणून "सबका साथ सबका विकास"अशा थापा मारत खऱ्या विकासाला ग्रहण लावणारांना मदत करून महाराष्ट्राशी फितूरी करणाऱ्यांना सांभाळण्याची अंधभक्ती आता बंद व्हावी.
वेदांत फॉक्सकॉनचा
६०-४० च्या भागीदारीचा २००० कोटी गुंतवणूकीचा सेमी कंडक्टर बनवणारा हा प्रकल्प आहे.त्यामध्ये ३ लाख रोजगार देण्याची क्षमता आहे. करोडांचा जीएसटी देणारा तो कल्पवृक्ष आहे.त्यावर आधारीत अनेक छोटे उद्योग सुरू होऊन येथील मराठी आणि बहूभाषिक बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या. तो अजून कोण्या राज्यात गेला असता तर संशयाला एवढी जागा राहिली नसती. परंतू अचानक गुजरातमध्येच कसा गेला हा संशोधनाचा विषय नक्कीच झालेला आहे.त्यानंतर मोदींकडून स्पष्टीकरणादाखल महाराष्ट्राला यापेक्षाही मोठा प्रकल्पाचे देऊ, असे सराईत चॉकलेट दिले जावे म्हणजे लहान मुलांना दाखविणारे जाणाऱ्या आमिषासारखे आहे.बालिशपणाआडून जखमेवर मिठ चोळणारा क्रूरपणा, कुत्सितपणा आहे.यातूनच हा प्रकल्प हिसकावून नेल्याच्या दगलबाजीवर शिक्कामोर्तब झाल्याची स्पष्ट जाणीव होते आहे.किंबहूना आम्ही एक नेला परंतू तुम्हाला यापेक्षा अधिक चांगला देऊ असे आश्वासन देणे म्हणजे भुकेलेल्याचा घास पळवून.... वरून "भगवान आपका भला करेगा,आपको ईससे भी अच्छी मिठी थाली मिलेगी" अशी क्रूर चेष्टा करण्यासारखे आहे.
महाराष्ट्रातील अगोदरच्या सक्रिय आघाडी सरकारमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक होते.त्यामुळे पुण्याजवळ तळेगांव येथे उभारला जाणारा हा प्रकल्प ईथे रहावा आणि वाढावा म्हणून या सरकारने सर्वतोपरी मदत दिलेली आहे.परंतू अचानक मांडवली करणारे खोकेबाज सामाजिक द्रोह करणाऱ्यांच्या कळपात दाखल झाले. त्यादिवसापासून अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या घोषणांपासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटमारीची सौदेबाजी सुरू झाल्याची चाहूल लागलेली होती.आता या करोडो रूपयांच्या प्रकल्पाच्या धक्क्याने त्याची खात्री पटलेली आहे.
आता तरी मुंबई आणि महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला येथील सत्ता आणि मुंबई महानगरपालिका का पाहिजे हे ओळखले पाहिजे.कंगाल होण्याअगोदर संमोहनातून जागं होऊन गुलामगीरी प्रस्थापित करणारी अंधभक्ती झुगारली पाहिजे.आता महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावरच कुठीराघात करून बेरोजगारांना रोजी रोटीची संधी घेऊन आलेला एक प्रकल्प तर गेला.एकनाथ शिंदेंना दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात महाराष्ट्राला कोट्यावधीचा चूना लावणारा अहेर करण्याचा ठेका येथील जनतेने उचललेला नाही हे पापी नेत्यांनी लक्षात ठेवावे.या बदलात आता पिता मुख्यमंत्री आणि नंतर मुलगा केंद्रीय मंत्री व्हायचा असेल तर त्याची किंमत महाराष्ट्राने का चुकवावी? याप्रमाणे यांना असे बहूमान आणि अनैतिक माया कमावण्याच्या संधी पुढे कशा मिळत जातात हे सुध्दा जनतेने पाहत रहावे.कारण भाजपच्या गंगेत पवित्र झालेल्यांची भविष्ये उज्ज्वल ठरून त्यांच्यावरील गुन्हेही फाईलबंद होत असतात भाजपच्या परिशस्पर्शाची जादुई कहाणी आहे.
हा प्रकल्प आघाडी सरकारमुळे गेला अशी खोटारडी आरडाओरड शिंदे आणि फडणवीस करत असतील तर आपण सुपरपावरचे खोकेबाज वारसदार येथे असतांनाच हा प्रकल्प गुजरातच्या घशात जाण्यापासून आपणास का थांबविता आला नाही.महाराष्ट्रात आपण केवळ सत्तेच्या तुकड्यासाठी निर्माण करून ठेवलेली राजकीय अस्थिरता आणि अराजकतेमुळेच आता अनेक गु़ंंतवणूकदार महाराष्ट्रापासून सुरक्षित अंतर राखण्याचे प्रयत्न करणार आहेत.मग या सत्त्याचे खापरही हे मोदींचे चेले आघाडी सरकारवरच फोडणार आहेत काय?सत्तेची अगतिकता आणि लाचारीत आता महाराष्ट्रालाही विकणारे सौदागर ठरणार काय? अशा या सत्ताधाऱ्यांच्या समाजप्रतारक वाटचालीचे अवलोकन करून जनतेने आपल्या चुका आता दुरूस्त कराव्यात.... की मग अजून भिकारी होण्याची वाट पहावी यावर चिंतन झाले नाही तर विनाश अटळ राहणार आहे....!
आपल्या प्रतिक्रिया द्या....