परभणी/गंगाखेड: झोपेत विषारी सापाने दंश केल्याने मातेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यांतील रुमणा येथे मंगळवार १८ जून रोजी पहाटे घडली आहे. तर आठ वर्षीय मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील रुमणा येथील सुभाष जानकीराम कांबळे यांच्यासह पत्नी सिमा सुभाष कांबळे, मुलगी कल्याणी कांबळे व मुलगा साईनाथ कांबळे हे सोमवार १७ जून रोजी रात्री घरी झोपले होते. मंगळवार १८ जुनच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास सिमा सुभाष कांबळे वय ३७ वर्ष यांना चकरा येत असल्याने व मुलगा साईनाथ कांबळे याच्या ही तोंडाला फेस येत होता. यावेळी सुभाष कांबळे यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यांना पहाटे गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासठी दाखल केले.
तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश शाहू, परिचारिका आशा डुकरे, शितल पांचाळ यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठविले. परभणी येथील डॉक्टरांनी दोघांची तपासणी करत सिमा सुभाष कांबळे यांना मयत घोषीत केले. तर साईनाथ कांबळे यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी विनोद जानकीराम कांबळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास (Gangakhed Police) पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, जमादार दिपककुमार व्हावळे हे करीत आहेत. झोपेत सर्प दंश झाल्याने मातेचा मृत्यु झाल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.