वाशिम: येथील स्थानिक औषध निर्माण भवन येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. माधव बावगे यांचा वाशिम जिल्हा दौरा निमित्त कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात पी.एस.खंदारे यांनी चळवळीच्या गीतांनी केली.सुरुवातीला उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिचय करून घेतला. यानंतर वाशिम जिल्हा प्रधान सचिव महेश देवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा विशद केली. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री विजय शिंदे यांनी संघटनेची पंचसूत्री विविध उदाहरण देऊन अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितली. कार्यकर्त्यांनी ही चळवळ येथायोग्य पणे समोर घेऊन जाण्याची आवश्यकता त्यांनी प्रकट केली. यानंतर वाशिम शाखा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी समितीच्या मागील 23 वर्षापासूनच्या कारकीर्दीचा आढावा सादर केला. खडतर परिस्थितीमध्ये समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध उपक्रम न चुकता जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे पूर्ण करणे शक्य झाले असे त्यांनी सांगितले. यावेळी समितीच्या स्थापनेपासून विविध स्वरूपाची मदत करून समितीच्या वाढीसाठी मदत करणाऱ्या व सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचा माधव बावगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर अवयव दान व देहदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नामोल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रथमता सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची का आवश्यकता आहे? ही भूमिका त्यांनी समजून सांगितली. सध्या आपला देश एका वेगळ्या वळणावर जाताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकीकडे विज्ञान युगाची कास धरण्याची आवश्यकता असताना धार्मिक कर्मकांडाकडे देशवासीयांना वळवण्याची वृत्ती समाजात मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याची सूचना वजा इशारा त्यांनी दिला. सध्याची परिस्थिती चळवळ समजण्यासाठी विषम असताना देखील कशा पद्धतीने सकारात्मक राहून जोमाने संत समाज सुधारकांचा व महापुरुषांचा विचार व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सातत्याने करावे यासाठी सकारात्मक विचारांची पेरणी त्यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलखुलासपणे त्यांच्या शंका कार्याध्यक्षांना विचारल्या. चळवळीचे कार्य करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून व त्यांचा सहभाग चळवळीमध्ये वाढेल अशा प्रकारे विधायक कार्याची निवड करून चळवळ समोर नवी अशा प्रकारचा बहुमलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये वाशिम जिल्ह्यामधील विविध समविचारी संस्था संघटना व व्यक्ती यांच्याशी मनमोकळा संवाद साधन्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, शिक्षक प्रतिनिधी माधवराव काळबांडे हे उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य वाखाणण्याजोगे असून आगामी काळात देखील समितीला वेळोवेळी मदत करू अशी आश्वासन उपस्थित समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिले. यावेळी प्रा.अनिल बळी,मधुकर बनसोड, मधुराणी बनसोड, उमेश शेंडे ,उपाध्यक्ष जनकराव वायचाळ, बुवाबाजी विभाग प्रमुख दत्तराव वानखेडे, युवा विभाग
प्रमुख प्राध्यापक इस्माईल खा पठाण, सीमा शृंगारे, जयश्री भडांगे, भारत ठोंबरे, प्रधान सचिव महेश देवळे,प्रा.सुभाष अंभोरे आदी सह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सखारामजी ढोबळे हे होते तर सूत्रसंचालन युवराज राठोड यांनी केले