वाशिम : अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांचे कुटुंब सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागणारे दांडगा जनसंपर्क असणारे आदर्श कुटूंब म्हणून ओळखले जाते.परंतु अशा आदर्श कुटुंबावर अकस्मात काळाने झडप घातली.आणि अवघे समाजमन हळहळले.या बाबत अधिक वृत्त असे, शुक्रवार दि. 03 मे 2024 रोजी दुपारी 02:00 वाजता अकोला येथे मामांकडे जाण्याकरीता शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांचे लहान भाऊ से.नि. प्राचार्य अरुणराव सरनाईक यांचे चिरंजीव (मुलगा) रघुवीर अरुणराव सरनाईक (वय 25 वर्ष) हे आपली मोठी बहिन सौ.शिवानी अजिंक्य आमले ( वय 28 वर्ष) भाची कु.अस्मिता अजिंक्य आमले (वय ९ महिने) नातेवाईक सपनाताई देशमुख (वय 41 वर्ष), वैभव देशमुख ( वय 1 1 वर्ष ) यांचेसह स्वतः वाहन चालवित जात असतांना पातूर येथील नविन बायपास जवळच्या नानासाहेब मंदिरा समोरून भरधाव येणाऱ्या कारने त्यांच्या गाडीला भिषण धडक दिली.ही धडक एवढी जबरदस्त होती की,दोन्ही वाहनाचा चुराडा झाला.या रस्ता अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील भाऊ बहिन भाची असे तिघे जागीच ठार झाले. तर सपनाताई देशमुख व वैभव देशमुख हे गंभीर जखमी आहेत.तर दुसऱ्या वाहनातील तिघे ठार झाले.एकंदरीत दोन्ही वाहनातील एकूण सहा व्यक्ती ठार झाल्या असून आज शनिवार दि. 04 मे रोजी सकाळी 09:30 वाजता श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सरनाईक कुटुंबातील स्व.रघुवीर सरनाईक, सौ. शिवानी अजिंक्य आमले, कु. अस्मिरा अजिंक्य आमले यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी बराच मोठा आप्त परिवार,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा परिवार, आमदार ॲड श्री किरणराव सरनाईक मित्र मंडळ वाशिम यांचा वाशिम,नागपूर,अमरावती, अकोला,कारंजा (लाड) येथील बराच मोठा मित्रपरिवार व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.अंत्यसंस्कारानंतर पसायदान होऊन उपस्थितांनी सामुहिक श्रद्धांजली अर्पण करीत प्राचार्य अरुणराव सरनाईक, आमदार ॲड किरणराव सरनाईक व परिवाराचे सांत्वन केले.यावेळी सरनाईक कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे समाजमन हळहळत होते.तसेच यावेळी कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना तथा करंजमहात्म्य परिवाराचे प्रदिप वानखडे,संजय कडोळे, मित्रमंडळाचे विठ्ठलराव लाड,रमेश लांडकर,कडू पाटील आदींनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.