ईश्वरपूर:- शहर जि. सांगली येथील महावीर तरुण व्यवसायी प्रभात शाखेच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर, ईश्वरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांना पर्यावरण जागृती करण्याच्या दृष्टीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा उपक्रम आयोजित केला होता. गतवर्षी २९ जून २०२३ रोजी विठ्ठल मंदिर येथे शाखेच्या वतीने स्वयंसेवकांनी सकाळी ०७.०० ते ०८.३० या वेळेत प्रत्येक येणाऱ्या भाविकांना त्यांच्याकडील प्लास्टिक पिशवी स्वतःकडे ठेवून घेऊन, त्यांना कापडी पिशव्या देणे व प्लॅस्टिकचे दुष्परिणाम सांगण्याचा उपक्रम केला होता. गतवर्षी साधारणपणे २५० इतक्या कापडी पिशव्या भाविकांना देण्यात आल्या होत्या.
यावर्षी देखील दिनांक १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी निमित्त हाच उपक्रम आयोजित करण्यासाठी शाखेची बैठक झाली. परिसरातील व्यापाऱ्यांकडून कापडी पिशव्यांचे संकलन करण्यात आले. स्वयंसेवक सकाळी सात वाजता शाखेत येऊन त्यांनी तुळशीच्या रोपांचे वृक्षारोपण मंदिर परिसरात केले व ठरल्या प्रमाणे कापडी पिशव्या घेऊन मंदिर परिसरामध्ये ओळीत उभे राहिले. एक एक करत अबाल वृद्ध भाविक मंदिरात येत होते व दर्शन घेऊन जात होते. परंतु उल्लेखनीय बाब म्हणजे कोणत्याही भाविकांच्या हातात प्लास्टिक पिशवी आढळून आली नाही. सर्व भाविक प्रसाद, हार हे स्वतःच्या कापडी पिशवी मधून घेऊन येत होते. स्वयंसेवक ठरलेल्या योजनेप्रमाणे सकाळी ०७.०० ते ०८.३० पर्यंत थांबले, परंतु उपक्रमासाठी आणलेली स्वतःजवळील एकही कापडी पिशवी ते भाविकांना देऊ शकले नाही. मागील वर्षी केलेल्या उपक्रमाचा एक अतिशय चांगला सकारात्मक परिणाम दिसून आला व संघाच्या शाखेने आयोजित केलेला हा उपक्रम अयशस्वी ठरला.
नागरिकांमध्ये झालेली जागृती पाहून अयशस्वी झालेल्या उपक्रमाचा मात्र सर्व स्वयंसेवकांना आनंद झाला. यावेळी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना शाखेच्या स्वयंसेवकांच्या शेतामधील सेंद्रिय कलिंगडांचे वाटप करण्यात आले.