कारंजा :- तळागाळातील पालात रहाणारा भटका विमुक्त समाज, शरीराने अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग, दुर्धर आजारग्रस्त असणारे व्यक्ती आणि पारंपारिक लोककलावंत यांच्या न्याय्य हक्काकरीता लढणारे समाजसेवक संजय कडोळे यांचा नुकताच नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ता महासंमेलनात लॉन्गमार्च प्रणेते प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांच्या हस्ते, राज्यस्तरिय "राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार" देवून गौरव करण्यात आला आहे. पुरस्काराचे सन्मानचिन्ह, पुरस्कारगौरवपत्र, तिरंगी शाल, भारतिय संविधान ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरचे अध्यक्ष प्रा. गिरीश पांडव हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, लॉन्गमार्च प्रा. जोगेन्द्र कवाडे, "नाळ" चित्रपटाची अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, विकसनशिल उद्योजक रमेश लोखंडे, इंजि. रूपराज गौरी, नागपूर मनपा कर्मचारी बँकेचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम, माजी नगरसेवक मनोज गावंडे, मनोज साबळे, सुभाष भोयर, प्रा. राहुल मून, साहित्यीक जे.टी.लोणारे, श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष ऍड. अशोक यावले, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.प्रा. प्रकाश सोनक, सचिव दिनेश बाबू वाघमारे इत्यादी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी तरुणाईत कित्येकवेळा रक्तदान केले असून ते सातत्याने आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबीर, कलावंत मेळावे घेत असतात. सध्या ते स्थानिक महाराष्ट्र शासन वनविभाग पुणे येथील हरितसेनेचे सदस्य, वृध्द साहित्यीक लोककलावंत कोव्हिड अर्थसहाय्य जिल्हा निवड समिती वाशिमचे अशासकिय सदस्य असून ते ज्ञानगंगा साहित्य मंडळ, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष असून, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून,ते हाडाचे लोककलावंत, प्रसिद्ध साहित्यीक व उत्कृष्ट पत्रकार असून त्यांना यापूर्वी सन २०१९ मध्ये तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांचे हस्ते, चंद्रपूर येथील व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात, "राष्ट्रपिता व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार" मिळालेला असून, त्यांना सन १९८६ पासून विविध संघटनाचे शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत. शांतताप्रिय समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.