तालुक्यातील मुरूमबोडी शेतशिवारात दारू विक्रेत्यांचा ३३ ड्रम मोहफुलाचा सडवा पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या नष्ट केला. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ किमी अंतरावर असलेल्या मुरुमबोडी गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री केली जाते. दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावात आंबेशिवणी, आंबेटोला, उसेगाव, अमिरझा, धुंडेशिवणी, कळमटोला, भिकारमौशी, गिलगाव, खुर्सा, कुरखेडा, कुडकवाही या गावांतील लोक दारु पिण्यासाठी येतात. सोबतच परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. दारु गाळण्यासाठी शेतशिवारात ठीकठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे लागोपाठ दोन दिवस गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता ३३ ड्रम ६०० किलो मोहफुलाचा सडवा व साहित्य आढळले. घटनास्थळी मिळून आलेला जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिसांना बघताच दोन दारूविक्रेत्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही कार्यवाही पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई नाईक कलाम पठाण यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे संघटक अमोल वाकूडकर, रेवनाथ मेश्राम, स्वीटी आकरे उपस्थित होते.