ज्या आईवडिलांनी अपत्य प्राप्तीकरीता परमेश्वराकडे नवस केले. अल्लाहकडे साकडे घातले. ज्या आईने असह्य वेदना सोसीत नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरामध्ये तुम्हाला वाढविले व तुम्ही तरुण होईपर्यंत तुमचे लालन पालन करीत, तुमचे लाड पुरवीत , तुम्हाला हवे ते शिक्षण शिकवून तुम्हाला स्वतःच्या बळावर जगण्याकरीता, तुमचा संसार चांगला व्हावा व तुमच्या उदरनिर्वाहा करीता तुम्हाला रोजगार मिळवून दिला . तुमच्या लग्नप्रसंगी तुमची प्रत्येक हौस पूर्ण केली. दुदैवाने त्याच आईवडिलांना वृद्धापकाळी आजची दळभद्री औल्याद एकतर वृद्धाश्रमात पाठवीत आहे. किंवा स्वतः वेगळे राहून त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. काही दळभद्री औल्यादींचे आई वडिल तर अक्षरशः मंदिर-मस्जिद-बसस्थानक-रेल्वेस्टेशनसमोर भिक मागतांना आणि फुटपाथवर, आठवडी बाजार, बसस्थानक रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेले दिसतात. केव्हा केव्हा तर वृद्ध आई वडीलांनी दिलेल्या माहिती वरून काही भिकार्यांचे मुले मोठमोठया अधिकारी पदावर सुद्धा असतात. तर काही भिकारी सुनबाई कडून होणाऱ्या छळामुळे नकोशी झाल्याने परागंदा झालेली असतात. आणखी वर्तमान स्थितीत कोठे कोठे तर "आई वडील उपाशी आणि सासु सासरे तुपाशी" खातांना सुद्धा दिसतात. तेव्हा जसे बायकोच्या प्रेमापोटी तुम्ही सासू सासऱ्याचे लाड पुरविता तसे तुम्हाला जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा जवळ करायला हवे. आणि सुनबाईने सुद्धा तिच्या आई वडिलांनी जसा तिला जन्म देऊन प्रेम दिले. तसेच तिच्या नवरोबाला किंवा पतीराजाला सुद्धा त्यांच्या आई वडीलांनी जन्म देऊन तुझा सांभाळ करून तुझेशी संसार करण्यास लायक बनविले आहे.हे विसरता कामा नव्हे. लक्षात ठेवा आज जे वृद्धाश्रमात आई वडिलांना पाठविण्याचे किंवा वाळीत टाकल्या प्रमाणे त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे .त्याचा परिणाम भविष्यात फार वाईट होऊन तुम्हाला सुद्धा तुमच्या म्हातारपणी तुमची मुले वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाहीत व ही निश्चितपणे "काळ्या दगडावरील पांढरी रेघ" आहे. तेव्हा निदान तुमचा भविष्यात येणारा वृद्धापकाळ व तुम्हास येणारा तुमचा मृत्यु याची तरी थोडी जाणीव ठेवून भिती बाळगा. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी केले आहे. दिवसेंदिवस वाढणारे वृद्धाश्रम आणि आई वडिलांकडून येणाऱ्या तक्रारीची दखल आता आपल्या भारत सरकारने म्हणजेच शासनाने सुद्धा घेतली असून, आजच्या मुला सुनेकडून जर आईवडिलांचे पालन पोषण केले जात नसेल, वृद्धापकाळी त्यांना विविध हालअपेष्टा भोगण्याकरीता वार्यावर सोडले जात असेल तर अशा निर्दयी मुलांना शिक्षा व्हावी व वयोवृद्ध आई वडिलांना न्याय मिळवून देण्या करीता एल्डरलाईन - क्रं .14567 ही हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे. वर्तमान काळात देशातील वीस राज्यामध्ये अन्यायग्रस्त वयोवृद्ध मदत हेल्पलाईन नं.14567 वर अन्यायग्रस्त वयोवृद्धांनी कॉल केला तर त्यांची दखल लगेच घेऊन थेट मदत करण्याकरीता त्वरीत चौकशी केली जाईल व त्यामध्ये आई वडीलांनी पोलिसात तक्रार केली तर अशा मुलांना दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते तसेच मुले जर नौकरीवर असतील तर त्यांना न्यायालय आई वडीलांना खावटी द्यायला सुद्धा भाग पाडू शकते . आई वडिलाची तक्रार एल्डरलाईनच्या हेल्पलाईन न 14567 वर जाताच आई वडीलांच्या मदतीसाठी एल्डरलाईनचा प्रतिनिधी मदतीसाठी धावून येणार असल्याचे सुद्धा कळते. प्राप्त माहिती नुसार सध्या या हेल्पलाईनवर 12 लाख 70 हजार 191 कॉल प्राप्त झाले असून, त्यापैकी 1 लाख 42 हजार 42 वृद्धांना मदत करण्यात आली तर काही वयोवृद्धांच्या मुला-सुनेचे समुपदेशन करून आई वडीलांना त्यांचे हक्काचे स्वतःच्या घरी सुद्धा पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. तेव्हा आपल्या राज्यात, जिल्हयात, शहरात, गावात, वसाहती, नगर, मोहल्ल्यात किंवा तुमच्या घरात असे प्रकार होऊ नये. म्हणून प्रत्येक घरातील मुलाने व सुनबाईने आईवडिल-सासु सासऱ्यांचा निट सांभाळ केला पाहीजे. अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी तरी ठेवावी लागेल. तरी यापुढे आई वडिलांचे आशिर्वाद घेऊन पुण्य मिळवा किंवा त्यांच्या श्रापाने मानहानीचे-बदनामीचे जीवन जगा. लक्षात घ्या निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त तुम्ही तुमची जबाबदारी स्विकारून वयोवृद्ध आईवडिल-सासु सासऱ्याचे निट पालन पोषण संगोपन केले तर तुम्ही कलियुगातील श्रावण बाळ व्हाल. आणि आपल्या देशातील वृद्धाश्रम तर बंद होतीलच शिवाय मंदिर मस्जिद, फुटपाथ, बाजारपेठेत भिक्षा मांगताना तुमचे आई वडिल कदापीही दिसणार नाहीत. आणि त्यांच्या व जगाच्या नजरेत तुमची मानहानी होणार नाही. व सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे चांगले संस्कार तुमच्या मुलामुलीवर होऊन तुमच्या म्हातारपणी ते सुद्धा तुमची अशीच काळजी घेऊन संगोपन करतील असे समाज प्रबोधन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी या वृत्ताद्वारे केले आहे.