कारंजा (लाड) : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने,अमली पदार्थ विरोधी दिना निमित्त दि 26 जून रोजी, एका छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक न्याय दिन आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. सर्वप्रथम उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेच पूजन व हारार्पण केलं. सदरहू कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळ, कारंजाचे प्रचारक प्रदिप वानखडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उमेश अनासाने होते. खर्चाला पूर्णपणे आळा घालीत,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या संपूर्ण जीवनात सामाजिक समते करीता संघर्ष करून,आपल्या नागरिकांकरीता केलेल्या उपाययोजनांची माहिती उमेश अनासाने यांनी दिली. त्यानंतर बोलतांना संजय कडोळे म्हणाले, नशायुक्त अंमली पेयाच्या सेवनाने मनुष्याचे जीवनाचा सर्वनाश होतो त्यांच्या संसाराची व सुखाची होळी होते . वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या वर्तणुकीत अचानक बदल दिसून येतो.मुले जर अमली पदार्थाच्या आहारी गेली तर अभ्यास,खेळ व अन्य कार्यक्रमात त्यांचे मन रमत नाही. शाळेच्या उपस्थितीवर देखील त्यांच्या परिणाम होतो.पैसे मिळण्यासाठी पालकांकडे ती सातत्याने मागणी करतात.घरातील वस्तूंची ते चोरी करण्यास मागेपुढे पाहत नाही. डोळे लाल,निस्तेज होणे, डोळ्याखाली सूज येणे,बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे,भूक न लागणे, वजन कमी होणे,निद्रानाश, कपड्यांबद्दल व व्यक्तिगत स्वच्छतेबद्दल बेफिक्रेने वागतात. व्यसनाचा परिणाम व्यक्तीच्या फुफ्फुस आणि स्मरणशक्ती होतो. अवयव निकामी होतात.व्यक्तींमध्ये अस्वस्थता व मानसिक आजार वाढतात.सर्व व्यसनांवर निश्चितच उपचार आहे. अमली पदार्थांच्या व्यसनातून सहजपणे बाहेर येण्यासाठी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.प्रत्येकाने अमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे. मनुष्य जीवन हे सुंदर आहे. कारण ते एकदाच मिळत असते. त्यामुळे हे जीवन सुंदर बनविण्यासाठी आरोग्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. व्यसनी तरुणाई नको त्या मित्रमंडळीच्या सहवासातून व्यसनाधिन होत असते. त्यामुळे आई वडिलांनी अशा मुलांची मानसिकता लक्षात घेऊन,प्रेमाने अशा मुलांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून दूर केले पाहीजे. असे संजय कडोळे यांनी सांगीतले.