शेती म्हटले कि पावसाचे फार मोठे योगदान आहे आणि त्यातही वरच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी जास्त. पाउस हा दिवसेंदिवस कमी कालावधीचा, अवेळी, कधी दुष्काळ तर कधी पूर परिस्थिती, इत्यादी निसर्गात घडामोडी घडत असतात. अश्या सर्व बाबीवर आपली शेतीमधील पिक अवलंबून असते. हा सगळा जागतिक पातळीपासून ते ग्रामीण स्तरापर्यंत असून हवामान बदलामुळे सगळं तंत्र बिघडलेले दिसते. या सर्वांमुळे शेती नुकसानाच्या दारात गेली असून शेतकरी चिंतातूर होऊन गेलेला दिसतो. सगळं परावलंबी असल्यावर शेतकऱ्यांच्या हातात परिस्थितीच्या कलाकलाने जाणे एव्हडच ते उरलं आहे. हवामान बदलाच्या परिणामांना सहन करण्याकरिता शेतकरी व काम करणाऱ्या संस्था-संघटना, सरकार आपापले मार्ग शोधून यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्यातलाच एक छोटासा प्रयत्न म्हणजे ब्रम्हपुरी तालुक्यातील गायडोंगरी गावात स्थापन केलेले "माहिती केंद्र" आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्यातर्फे ब्रम्हपुरी भागात एकूण ९ गावांमध्ये राबवीत असलेल्या "आदिवासींची शाश्वत उपजीविका" या प्रकल्पांतर्गत गेल्या २०१५ पासून उपजीविका या विषयावर काम सुरू आहे. गायडोंगरी हे त्यातीलच एक गाव. गावाची एकूण लोकसंख्या ३६५ असून जवळ-जवळ ७० कुटुंबांची वस्ती आहे. वातावरणातील होणारा बदल, संबंधित सरकारी विभाग व त्यांचे संपर्क क्र., जनावरांचे लसीकरण नोंद व बाजार भाव इत्यादी सर्व गोष्टींचा सर्व गावकऱ्यापर्यंत पोहोचतील या उद्देशाने, समावेश असलेले भिंती फलक या गावामध्ये मागील वर्षी स्थापन करण्यात आले. त्यामध्ये उपजीविकेसंबंधित IEC मटेरियल सुद्धा या अंतर्गत आहे. रोजच्या हवामानाबद्दलची माहिती भिंती फलकावर दर्शविण्याचे काम गायडोंगरी येथील समृद्धी शेतकरी गटातील महिला प्रामुख्याने करतात, ज्याचा अन्य लोकांना फायदा होताना दिसत आहे. यामध्ये संस्थेचे कार्यकर्ते रामदास मैंद व दर्शना निकम यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. या सगळ्यांचा समावेश असणारे माहिती केंद्र आज गायडोंगरी या गावाला लाभलेले असून त्याचा उपयोग गावकरी मंडळी वातावरणाला प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे, ज्या सर्वांचा उद्देश शेतकऱ्यांची उपजीविका मजबूत करून हवामान बदलामुळे उद्भवलेली असुरक्षितता कमी करण्याचा प्रयत्न आहे.