गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला असताना, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि 'आपदा मित्र' देवदूत बनून धावले. सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या तात्काळ आदेशाने आणि विविध यंत्रणांच्या समन्वयाने, पुराच्या पाण्यातून मार्ग काढत आरोग्य पथकाने वेळेवर उपचार केल्याने चंद्रय्या कुमारी या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
सिरोंचा तालुक्यातील सोमनूर नवीन येथील रहिवासी असलेल्या श्री. चंद्रय्या कुमारी यांना काल दुपारी सापाने दंश केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक होते. मात्र, मुसळधार पावसामुळे परिसरातील मुत्तापूर नाल्याला पूर आल्याने रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते आणि वेळेवर उपचार कसे मिळणार या चिंतेने ते हवालदिल झाले होते.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक आणि तालुका आरोग्य अधिकारी कन्नाके यांनी तात्काळ आपदा मित्र पथक, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाला तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच, सिरोंचा येथील 'आपदा मित्र' मास्टर ट्रेनर किरण वेमुला यांचे पथक, पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे पथक पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे मार्ग काढत आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकाने चंद्रय्या कुमारी यांना गाठले. आरोग्य पथकाने तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. सध्या चंद्रय्या कुमारी सुखरूप असल्याची आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी दाखवलेली तत्परता आणि विविध विभागांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या धाडसी कामगिरीबद्दल बचाव कार्यात सहभागी असलेल्या आपदा मित्र पथकाचे, पोलिसांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कौतुक केले आहे.