ग्रामगीतेतील ग्रामशुध्दी
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. महाराज म्हणतात, माझा देव साधना रुपाने देवळात असला तरी अनुभवाने तो मनात असला तरी कार्यरुपाने जनात आहे. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे. खेडेगाव समृद्ध व्हावे व सर्वांचे हात श्रमासाठी सरसावले पाहिजे. महाराजांनी खेड्याची दुरावस्था जाणली आणि ग्राम कसे सुधारेल याचा विचार केला. आज ग्रामराज्यात राम नाही कारण सर्वत्र गोंधळ चालू आहे. कुणी कोणाचे ऐकत नाही. खेड्यात गेले की, रस्ते घाणीने माखलेले दिसते. जागोजागी घाणेरड्या पाण्याचे डबके दिसतात. कचरा असलेले ढीग, डुकराचे खोपडे, कोंबड्याचे खुराडे असतात. गावात मनोरंजनासाठी दंडारी, तमाशेच दिसतात. आमचे खेडे उत्तम आहे असे कसे म्हणता?
खेड्याकडे चला म्हणता । परि एकही सोय नसे ।
घरे कसली? हुडेचि तत्वता । डुक्कर खोपडे, खुराडे ।।
गावातील जवान कार्यकर्ते आळशी होऊन खुशी उपभोगत आहे. गावाच्या सेवेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावाची सुधारणा होण्याऐवजी गुंडगीरी सुरु होऊन लोक स्वैराचारी झालेत. गावातील वतनदार, इजारदार, ग्रामजोशी यांनी गावाची सेवा करणे सोडले. ग्रामसुधारणेची तळमळ राष्ट्रसंताना होती तशीच ऋषी घुसरकर महाराज यांना होती.
ग्रामसेवेसाठी कुणी, घेत नाही धावरे ।
सुधारेल सांगा कसं, आपुलं हे गाव रे ।।
महाराज म्हणतात की, गाव कसे निटनिटके असावे पण कुणाच्या घराचा ओटा रस्त्यात आल्यामुळे जाणाऱ्याला अडथळा निर्माण झाला. कुणाचे घराचे छप्पर रस्त्यात आले त्यामुळे बैलगाडी पुढे जात नाही. नालीमधून येणारे घाण पाणी रस्त्यावर आले. जनावरे, माणसे चिखलात फसू लागली. घाणीमुळे मच्छर, जंतू बेसूमार वाढून रोगराईने लोक बेजार झालेत. गावची गोदरी रस्त्यात आली. घराचे काटेरी कुंपण व गवत यामुळे विंचू, सर्पानी वस्ती केली. विहिरीवर धुणे धुतात. गावाचे पंच झोपले काय? त्यांनी गावाची शुद्धी का करु नये. महाराज म्हणतात आदर्श ग्राम हाच राष्ट्राचा पाया आहे.
यारे यारे गरिबांनो या, काम हाती घ्या ।
करु खेड्याची सुधारणा काही हो ।।
राष्ट्रसंत ग्रामशुध्दीसाठी ग्रामसफाईची परंपरा व रामधूनची भूमिका ग्रामगीतेतून सांगतात. जसे शहरात भंगी साफसफाई करतात तसेच गावाची गल्ली स्वतः साफ करावी. देवळाजवळील परिसर सुंदर स्वच्छ ठेवावा. गावात कोणता उत्सव आला तरच मिरवणुकी निघतात. गावात श्रीगुरुदेव सेवा मंडळ असावे. त्यांनी सामुदायिक प्रार्थना व रामधूनची प्रदक्षिणेची परंपरा चालू करावी.
मित्र हो ! रामधून नाही आजची ।
ही आहे परंपरा प्रदक्षिणेची ।
प्रदक्षिणेत योजना होती कार्याची ।
तीच आहे रामधून ।।
महाराज म्हणतात, आपले गाव हे एक शरीरच मी समजतो, त्याला पवित्र ठेवू या. आपण जसे स्नान करतो तसेच गाव स्वच्छ ठेवा ना ! सर्वांनी ग्राम स्वच्छ करुन ग्रामोन्नतीचे पुण्य पदरी घ्यावे. गलिच्छ वातावरणाने शरीर व मन दुषित होते. म्हणून गावात रामधून काढण्यापूर्वी संपूर्ण गाव स्वच्छ करुन रस्ते रांगोळीने सजवावे. घरासमोर देवी देवताचे, महापुरुषांचे फोटो ठेवावेत. गावाला प्रदक्षिणा घालताना एका रांगेत उभे राहावे. रामधूनची भजने तसेच भारतमातेचा, संत महात्म्यांचा जयजयकार करावा. रामधूनचे शेवटी भाषण घेऊन त्यात जनतेने निटनिटके कसे राहावे हे सांगावे.
रामधूनपूर्वी गाव पूर्ण, व्हावे स्वच्छ सौंदर्यवान ।
कोणाही घरी गलिच्छपणा, न दिसावे कोठे ।।
ग्रामशुद्धी अध्यायात खताचे महत्त्व व व्यवस्था महाराजांनी सांगितली आहे. ग्रामसफाई करून ती घाण गावाबाहेर दूर नेऊन उघड्या जागी कंपोस्ट खड्डे तयार करावे. त्यात गोमूत्र, शेण, कचरा गोळा करून टाकावा. घरोघरी संडास बांधून बाहेर शौचास जाणे टाळा. स्त्री ही शौचास जातात, त्यांची कुंचबना थांबेल आणि घाणही होणार नाही. शेतीला सोनखत, शेणखत, कंपोस्टखत देऊन शेती भरपूर पिकेल. हीच खरी सेवा आहे, ती परमेश्वराला आवडणारी आहे. संत गाडगेबाबा म्हणतात, "माय बाप हो ! पशु की होत पन्हैया, नरका कछु ना होय । नर करणी करे तो, नरका नारायण होय." तुम्ही जेथे हात फिरवाल तेथे लक्ष्मी उभी राहील अन् गाव भु-वैकुंठ होईल, हे ध्यानात घ्या.
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे ।
हे सूत्र ध्यानी ठेवून खरे ।
आपले ग्रामचि करावे गोजिरे, शहराहुनि ।।
हा हात कुणाचा बाहेरचा नाही तर हा हात गावकरी लोकांचा आहे. ज्यादिवशी गावच्या लोकांचा हात फिरायला लागेल, त्यादिवशी आपले गाव नक्कीच स्वर्ग बनेल. गावात ग्रामसंघटन घडवून सर्व हात एकत्र येऊन गावाची ग्रामशुद्धी तसेच ग्रामनिर्माणाचा कार्यक्रम हाती घ्या. गावचा विकास घडवून आणावा.
लेखक :- पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....