"उचलेलेस तू मीठ मुठभर स्वराज्याचा रचला पाया" या ओळीतून देशात स्वराज्याचा पाया रचण्यासाठी हाल अपेष्ठा सहन करून सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आमच्या महापुरूषांचा ज्वलंत इतिहास आठवतो.गांधीजींपासून तर रक्त सांडणाऱ्या थोर क्रांतिकारकांचा.....त्याचप्रमाणे स्वातंत्र्यांचे,लोकशाही मुल्यांचे आणि नैतिक जीवनाचे महत्व समजण्यासाठी शिक्षणापासून तर सर्व प्रकारच्या प्रबोधनातून वैचारिक क्रांतीची मशाल पेटविणारे समाजसुधारक, सेवाव्रतींच्या त्यागी आयुष्याचा जीवनपट आठवतो.हा ईतिहास आणि कायम झालेल्या आदर्शांची पायमल्ली करून देश,संविधान आणि लोकशाहीला संपविण्यास निघालेले आजचे अनाचारी राजकारणीही आमच्या भारतभूमीत भुईछत्र्यांप्रमाणे उगवतील याची कधी कल्पनाही त्यांनी केलेली नसेल.कमी पाण्यात झपाट्याने वाढणाऱ्या बेशरमच्या झाडांप्रमाणे ह्या विषवल्ली फोफावतील, या अनिष्ट संकटाची चाहूल त्या सर्वास्वाची राखरांगोळी करून नुसत्या सामाजिक आनंदाची स्वप्ने पाहणाऱ्यांना कधीही लागली नसेल.क्रांतिकारक,स्वातंत्र्य संग्रामातील महापुरूष आणि थोर समाजसुधारकांच्या विचारांशी बेइमानी करणारा हा भयंकर सर्वनाशी उन्माद सुरू आहे.तो माणूस म्हणविल्या जाणाऱ्या परंतू विध्वंसात आनंद मानणाऱ्या अमानुष प्रवृत्तींनी या देशात निर्माण केलेला आहे.
अशा परिस्थितीत या घोंगावणाऱ्या संकटांची कोणतीही तमा न बाळगता दगडांप्रमाणे असंवेदनशील झालेली माणसे उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत आहेत,सहन करीत आहेत.मुक्या बहिऱ्यांप्रमाणे काही बधीर झाली आहेत. तर दुसरा एक मतलबी गट याच प्रवाहात हात धुऊन घेण्याच्या कामाला लागलेला आहे. आपल्या हलकट वृत्तीने मानवी समाजात खड्ड्यात गेला तरी चालेल परंतू या कळपात गडगंज संपत्तीने माझं फक्त भलं झालं पाहिजे या विचारांनी तो सक्रीय आहे.या अघोरी महत्वाकांक्षेने समाजाचं वाटोळं करण्यासाठी या अनाचारी पिसाटांची समर्थनंं करीत समाजाला मुर्ख बनविण्याची पापे ही मंडळी करीत आहे.परवा या दडपशाही,झुंडशाहीच्या अनैतिक थैमानावर सतत वज्राघात करणारे दै.सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात घालता येत नव्हता म्हणून दुसऱ्या ईडीकडून अटक करविण्यात आली.ते खरोखरच दोषी आहेत की निर्दोष ते येणारा काळ आणि न्यायालयच ठरवेल.रात्रंदिवस भाजपची चाकरी करणाऱ्या ईडीची ही काही पहिली वहिली कारवाई नाही.
यापूर्वी छोट्या बालकांना झोपेसाठी दारासिंग दाखविला जात होता,आता बिचाऱ्याला या वयातच ईडीची पण ओळख झालेली आहे. इतकी ही अविस्मरणीय जबर पिडी आहे...!परंतू ज्या निश्चित वेळेत संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला, ती पध्दत आणि त्याअगोदरचे दिल्या गेलेले इशारे ऐकून तरी हा सुडबुध्दीने घडवून आणलेला कार्यक्रम शिवसेनेला प्रहार आहे.कारण ह्या नेहमी होणाऱ्या कारवाया ह्या ईडी अधिकाऱ्यांच्याही अगोदरच भाजपच्या वाचाळविरांना माहिती झालेल्या असतात.हे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील कधी अनुभवायला मिळाले नव्हते एवढे ज्वलंत आश्चर्य आहे.म्हणून या जुगाडांतील सत्त्य- असत्त्य हे समजण्याईतपत महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणातील संवेदनशील जनता बुध्दू नाही आणि वेड्यांच्या शाळेतील अंधभक्तसुध्दा नाही.
देशातील अनेक सरकारे जबरदस्तीने पाडून असंविधानिक मार्गाने सत्ता हिसकावून सरकारेपाडू राज्यकर्ते ही आपली खरी ओळख भाजपने जगात सिध्द केलेली आहे. आता महाराष्ट्रातही शिवसेना फोडून लाचारांना गळाला लाऊन मुघल साम्राज्याच्या विस्ताराची आठवण व्हावी असे कारनामे सुरू झालेले आहेत.याची महाराष्ट्रातील काही नेत्यांना थोडी तरी खंत आणि शरम वाटली पाहिजे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी अत्यंत उन्मादी आनंदात केलेले सत्यकथन आणि त्यांची दिव्य भविष्यवाणी बिहारातून जाहिर झालेली आहे.ती सर्वांना संपवून एकाधिकारशाहीच्या दिशेने जाण्याच्या अमर्याद महत्वाकांक्षी स्वप्नपूर्तीच्या षडयंत्रांची चाहूल देणारी आहे.परंतू हा तकलादू आनंद दाखवतांना नड्डा यांनी आपण कोणी महापुरूष नाही,त्यामुळे हा एक दिवस स्वत:लाच गाडणारा खड्डा ठरणार आहे याची मानवी स्तरावरकाही समजच नसावी शिल्लकच हे स्पष्ट होते.कारण असंविधानाक पध्दतीने विरोधक संपविण्याचे आत्मघातकी डाव आणि त्यातून जबरदस्तीने हिसकाविलेल्या सत्ता हे निर्भेळ विजय कधीच नसतात हे सत्त्य समजून घेतलं पाहिजे.परंतू विध्वंस करीत जिंकलो जिंकलो म्हणून बेभान नाचणारे मनाच्या खोटेपणात हरविलेले असतात. त्यांना या वास्तवतेचे कधीच भान नसते.
महाराष्ट्रातील राजभवनातून भाजपचे राजकारण चालविणाऱ्या स्वामिनिष्ठ सेवकाने लोकशाही आणि संविधानाची तिन वर्षांपासून जागोजागी घोर प्रतारणा केलेली आहे.यातून आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही इतकी खालच्या पातळीवरील आपली लायकी या माणसाने सिध्द केली आहे. विपर्यस्त विधाने करून महापुरूषांचे अपमान केले.परवा तर मिठू मिठू पोपटाची भूमिका वठवून मुंबईतील मराठी लोकांच्या त्याग,कर्तृत्व आणि श्रमशक्तीचा अपमान करून सामाजिक सद्भावनांनाही तडा देण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तशाच अघोरी गर्जना बिहारातून जे.पी नड्डा यांनी केल्या आहेत.
देशातील कोणत्याही राज्यांमध्ये भाजपला आव्हान देण्याचे सामर्थ्य असणारा कोणताच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष यापुढील काळात आता शिल्लकच राहणार नाही अशी नड्डांची भविष्यवाणी आहे.महाराष्ट्रात शिवसेना संपविली.कॉंगेसचाही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळलेला आहे.त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचेही आम्ही पतन केलेले आहे.बिहारमध्ये आम्ही राजदशी लढतो आहोत, नवीन पटनाईक यांचा एकट्या माणसाचा पक्ष आहे. भाजपला कोणीही मात देऊ शकत नाही,सध्या ठीकठीकाणी होणारी जंगी स्वागतं म्हणजे भाजपची सिध्द होणारी लोकप्रियता आहे.हे सांगतानाच त्यांनी तेवढ्याच कुत्सितपणे उपहास आणि प्रचंड रावणी अहंकाराने सर्वच प्रादेशिक पक्ष लवकरच संपून भाजप हा एकच पक्ष फक्त देशात शिल्लक राहणार असल्याची अघोरी महत्वाकांक्षी स्वप्न प्रगट केले.हे ऐकून भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींना काय वाटले असेल हे आता त्यांनाच विचारावे लागेल.परंतू अविवेकाने प्रजाधर्म आणि मानवता विसरून अनैतिक बळांचे अतिरेक वापर जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा जागृत होऊन उठावातून त्या अहंकारी प्रवृत्तींना ठेचून नेस्तनाबूत करण्याचे कामही याच मानवी समाजाने केलेले आहे.नियतीनेही दृष्टांना संपविण्यासाठी आपल्या दिव्य आयुधांच्या गजबळांचे समर्थन याच समाजाच्या पाठीशी उभे केलेले आहे.हे चिरंतन ऐतिहासिक सत्त्यही अशा अहंकारी घोषणा करणा-यांनी कधीही लक्षात ठेवले पाहिजे.
सर्व विरोधी पक्षांना शरपंजर करून लोकांना अमानुष अत्त्याचारांमध्ये पिचत ठेवणारा भाजपच्या सैतानी वृत्तीचा एकच महाकाय अड्डा या नड्ड्ंना देशात पाहिजे आहे.मग तेथून पुढे कोणीही विरोध करणारा शिल्लक राहणार नाही.अशा वातावरणात देशातील जनतेला गुलाम बनवून हूकूमशाहीच्या हिटलरी कारभारांची आनंदी स्वप्ने बघण्यात मोदींचा नवरत्न दरबार मश्गूल आहे. जनसामान्य, कष्टकरी, श्रमिकांच्या अंगावरील वस्त्रेही काढून त्यांना नागवं करण्याचे हे क्रूर कार्यक्रम आहेत.असे मनसुबे घेऊन प्रजेची लूटमार करीत स्वत:च्या अनेक पिढ्या ऐशोरामामध्ये लोळवत ठेवण्याचा भ्रष्ट सत्तापिपासू वाटचालीचा हा इशारा आहे.सत्तेचे अवैध मार्गांनी विस्तारीकरण,महागाई,प्रचंड करांची ओझी या मलिद्यांवर यांची सत्ताकारणे आणि डोंगरं,हाटील,झाडी चालू आहेत.कोरोनाच्या संकटालाही या लोकांनी संधी बनवून त्यातून गडगंज पैसा गोळा केल्याचे आरोप आहेत.प्रभू श्रीरामाच्या नावाचा आणि धर्माचा दुरूपयोग करीत अधर्माने आपल्या झोळ्या भरून घेण्याच्या आरोपींच्या कठड्यात ही मंडळी आहे.परंतू तरीही त्याचे कोणते हिशोब आणि स्पष्टीकरणे देण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. कोरोनात बळी जाणाऱ्यांचे म्हणजे माणसांच्या मढ्यांचेही भांडवलं करून सत्ताधाऱ्यांनी पैसे गोळा केला अनावश्यक औषध कंपन्यांना झुकती माप देऊन पैशांची लूटमार झालेली आहे.आता नैसर्गिक साधनसंपत्तीवरही कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत.त्याचाच नव्या निर्णयाचा एक ट्रेलर म्हणून आता स्वतःच्या घरासमोर,शेतात बोअर कराल किंवा विहीर खोदाल तर १० हजार भरून सरकारी परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.अनीतीच्या भ्रष्ट मार्गाने माया कमावण्यात आज भाजप हा एकमेव पक्ष अग्रेसर आहे.त्यांच्याकडे असणारा प्रचंड पक्षनिधी कोणत्याच पक्षाकडे आज नाही.तरीही अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना पावन करून घ्यायचे आणि इतरांवर ईडीच्या कारवाया सुरू करायच्या अशा प्रकारे विरोधक संपवून आपला अवैध राजमार्ग सुरक्षित करण्यासाठी ही दडपगीरी सुरू आहे.हा नीतिमुल्ल्यांना गुंडाळत सर्वांना संपविण्याच्या वळणावरून अराजकतेच्या हुकूमशाही कडे सुरू असलेला प्रवास आहे...!
लोकशाही,नैतिक मुल्ये,राजधर्म,आणि संविधानाचा अनादर करीत मन मानेल तशा विदुषकी उड्या मारणारे राज्यपाल, त्याचप्रमाणे संकटकाळात महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळून सत्तेच्या खेचाखेचीत समाजाच्या मनोबलावर आघात करणारी सध्याच्या सत्तेत असणाऱ्या शकूनी भाजप नेत्यांची मागील क्रूरकृत्त्ये,विरोध मोडून काढण्यासाठी दिल्लीच्या सुपरपावरकडून ईडीचे खास फक्त विरोधकांवर सोडलेले अग्नीबाण, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना संरक्षित करून क्लिन चिट देण्याचे खोटी कृत्ये,अशी मोजदाद होणार नाहीत एवढी प्रचंड पापांच्या ह्या राशी आहेत....! तरीही अंधभक्तांना हे रामराज्य वाटते,म्हणजे अशांच्या बुध्यांकांची गणना वेड्यांच्या वर्गात करावि का? या संमोहनाच्या गारूडी करामतींमधून ग्लानी आलेल्या समाजाला अजून तरी शुध्दीवर यावे लागेल. आता तरी सावधगीरीच्या अवस्थांमध्ये त्याने प्रवेश करणे ही काळाची गरज आहे.,या देशातील मतदार या अनाचाऱ्यांना विकल्या गेलेल्या शहरे ,गावं आणि मोहल्ल्यातील दलालांच्या नांदी लागून आपल्या मतदानांच्या चुका जर अजूनही करणार असतील, तर भविष्यात समाजाच्या वाटेला येणारे कष्ट,आपदा,आणि छळवाद टाळायला कोणी ब्रम्हदेव किंवा कोणी जादुई विभूती अवतरणार नाही.ज्याच्या त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची स्वातंत्र्यं आणि लोकशाहीदत्त शस्त्रे ही ज्याची त्यालाच, समाजातील प्रत्येकाला चालवावी लागणार आहेत.नाही तर येणारी वेळ कोणासाठीही थांबत नसते. काळ स्थिर राहू शकत नसतो.तो आपणास माफ करणार नाही.येणारी पुढील पिढी आपण केलेल्या चुका स्विकारणार नाहीत.आपल्या याच बेसावधपणाच्या चुकांमुळे भावी पिढीची आयुष्ये जर नेस्तनाबूतझाल्याशिवाय राहणार नाहीत.कष्टमय आर्थिक वाटचालीत पितृधर्माला सध्याच ओहोटी लागलेली आहे.परंतू पुढे येणाऱ्या त्या विशिष्ट वळणावर पोरं बापांनी केलेल्या चुका लक्षात घेतील आणि माफ करणार नाहीत.त्यावेळी त्यांच्यासाठी पितृऋण नावाचा शब्द तर शिल्लक राहणारच नाही,उलट वार्धक्यात झुकणाऱ्या त्या बापांना दुषणांची टोमणी सहन करण्याशिवाय दुसरे इलाज असणार नाहीत.कारण वेळ गेलेली असेल झालेल्या चुका दुरूस्त होणार नाहीत.भावी पिढ्यांच्या कष्टमय जीवनातील यातना हे मोठे दु:ख पचविण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहणार नाही.ही परिस्थिती आपल्या सर्वांसकट कोणावरही येऊ शकेल.त्याला अपवाद असणारांची संख्या ही नगण्य राहणार आहे. हे सत्त्य समाजाने लक्षात घेतले पाहिजे.संभाव्य धोक्याच्या वळणावरून सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या अनाचारी प्रवासाला मध्येच प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्याने जागृत झाले पाहिजे..!तुर्त एवढेच...!
आपल्या प्रतिक्रिया द्या....