कुणी घरकुल देता का घरकूल.! अशी आर्थ हाक वाशिम जिल्ह्याचे भटक्या विमुक्तांचे , दिव्यांगाचे नेते व निर्भिड पत्रकार संजय कडोळे यांनी शासनाला, आमदार - खासदार यांना प्रसार माध्यमाद्वारे दिली आहे.
"रग्गड श्रीमंत असलेल्या आमदारांप्रती सहानुभूती ठेऊन तुम्ही त्यांच्या बंगल्याचे स्वप्न मुंबई सारख्या महानगरी राजधानीत पूर्ण करायला निघालात मात्र, पालावर राहणाऱ्या भटक्या - विमुक्त, निराधार - बेसहारा - दिव्यांग आणि मंदिर - मस्जिद दर्गाहच्या जागेवर त्यांच्या आसऱ्याला राहणाऱ्या गोरगरीब मतदाराकरीता तुम्ही लोकसभा - विधानसभेत केव्हा आवाज उठवणार ? केव्हा त्यांचे घराचे नव्हे घरकुलाचे स्वप्न साकार करणार ? तुमच्याकडे भटक्या करीता, निराधार व दिव्यांगांकरीता घरकुलाची काही योजना आहे किंवा नाही ? की तुम्ही मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या नावाखाली निराधारांना दाखविलेल्या स्वप्नांचा स्वप्नभंग करून चुराडा करणार आहात ?" यासंदर्भात सविस्तर असे की, आजही भटक्या विमुक्त, निराधार, बेसहारा, दिव्यांग लोकांची शेकडो कुटूंब गावकुसाबाहेर पालावर राहून किंवा फुटपाथवर आपली गुजरान करीत आहेत . तर काही कुटूंबे जशी की, गोंधळी -नाथजोगी - मसनजोगी - वासुदेव समाज मंदिर - देवालयाच्या जागेत तर मुस्लिम समाजातील फकीर, छप्परबंद समाज मस्जिद - दर्गाहाच्या जागेत राहून आपली गुजरान करून आयुष्याचा एक एक दिवस पुढे लोटत आहेत तर बरेचशे निराधार - दिव्यांग अगदी फुटपाथ किंवा गावकुसाबाहेर पालावर कुत्र्या मांजराचे जीवन जगत आहेत . काही वर्षापूर्वी म्हणजेच इ सन २०१४ च्या निवडणुकांनतर मोठा गाजा - वाजा करून शासनाने प्रधानमंत्री घरकुल योजना सुरु केली होती आणि त्या योजनेच्या अंमलबजावनीचे गाजर दाखवीत, भटक्यांच्या पालावर जाऊन, फुटपाथवर जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत यांचा सर्व्हे सुद्धा करण्यात आला होता . यांचे छायाचित्र सुद्धा काढण्यात आलेत परंतु नंतर मात्र यांच्या घरकुलाचा प्रश्न कायमच राहीला . त्यात कोरोना महामारीचे पिशाच्च मानगुटीवर बसले आणि सर्वसामान्य मतदार नागरीकांच्या घरकुलाचा प्रश्न स्वप्नभंग झाल्या प्रमाणे शासनाच्या नजरेआड गेल्याचेच दिसून येते आहे तसेच निवडणुकीच्या वेळी यांना चिरीमिरी देऊन यांची मनधरणी करीत मतदान करण्यास यांना मतदान करण्यास भाग पाडणारी आणि यांच्या जीवावर निवडून येणारी खासदार - आमदार - नगरसेवक मंडळी प्रत्येक अधिवेशनात यांच्य घरकुलाचा प्रश्न मांडण्यास आणि यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यात मात्र कच का खातात ? भटक्याचे निराधारांचे प्रश्न विधानसभेत मांडून यांच्या घरकुलासाठी कायदा करून त्याची अंमलबजावनी का करीत नाहीत ? असा सवाल समाजसेवक संजय कडोळे यांनी उपस्थित केला असून येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा - विधानसभा निवडणुकांपूर्वी निराधार व असहाय्य व्यक्तिच्या घरकुलाचे स्वप्न साकार करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी लावून धरलेली आहे .