शासनाने नवीन 22 जिल्हे बनविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मागील 40 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1982 पासून सुरु असलेल्या ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीच्या मागणीने पुन्हा उचल घेतली आहे. या मागणीसाठी येत्या 2 जून रोजी आक्रोश मोर्चा काढून जनआंदोलन करण्याचा इशारा ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीनेपत्रपरिषदेतून दिला आहे.
ब्रह्मपुरी जिल्हा बनण्याच्या दृष्टीने सन 1982 पासुनच पूर्णतः निकषामध्ये बसला आहे. फक्त राजकीय प्रभावाने त्यावेळी ब्रह्मपुरी जिल्हा न बनता गडचिरोली जिल्हा घोषीत करण्यात आला होता. तेव्हापासून ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य नगरी म्हणून योग्य आहे. ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्ह्याची जुनी तहसील आहे. भौगोलिक दृष्टीने हा तालुका परिपूर्ण आहे. महसुलची जागा ब्रह्मपुरी शहराच्या सभोवताल आहे. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती सुसज्ज आहेत. इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्याला जिल्हा घोषित केल्यास अगदी कमी खर्च लागणार असल्याने शासनाने ही बाब अधोरेखीत केली आहे.यापूर्वी ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सातत्याने अनेक आंदोलने झाली आहेत. जिल्ह्यासाठी कोर्ट, कचेऱ्या नागरिकांनी पाहिल्या आहेत व ब्रह्मपुरी जिल्हा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातसुध्दा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तद्वतच ग्रामपंचायत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून या अगोदर शासनाला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता ब्रह्मपुरीकरांनी जिल्हा निर्मिती चक्काजामहोण्याकरिता ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीतर्फे कंबर कसली असून क्रांतीची मशाल घेऊन येत्या दि. 2 जून 2023 रोजी सकाळी 9 ते 2 दरम्यान येथील उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा व आंदोलन करत ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरणार आहेत. अशी माहिती शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दिली. यावेळी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक प्रशांत डांगे, विनोद झोडगे, सुरज शेंडे, अविनाश राऊत, सुधाकर पोपटे, राजू भागवत, दीपक नवघडे, सुरज विखार, राहुल सोनटक्के, सुनील विखार, यांच्यासह अन्य ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.