अकोला; २६ एप्रिल २०२४ रोजी अकोला मतदारसंघाचे मतदान असून दिव्यांग मतदारांना अधिकाधिक सोयी कशा मिळतील व शंभर टक्के मतदान होण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलाचे ब्रँड ॲम्बेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे कार्यरत आहेत . 24 एप्रिल २०२४ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयात अंध मतदारांनी ब्रेल लिपीचा उपयोग करून मतदान कसे करायचे ? व ते गुप्त कसे राहील ? यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती . सदर कार्यशाळेत डॉ विशाल कोरडे यांनी ब्रेल लिपी चा उपयोग मतदानाच्या दिवशी कसा होईल ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन अंध मतदारांना केले .
अंध मतदारांनी मतदान केंद्रावर गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांना ब्रेल लिपीतील उमेदवारांची यादी मागावी नंतर EVM मशीन वर उजव्या बाजूला असलेल्या ब्रेल लिपीतील क्रमांक स्पर्शाच्या साह्याने वाचून मतदान करावे म्हणजे हे मतदान गुप्त राहील अशी माहिती डॉ कोरडे यांनी दिली सदर कार्यशाळेला अकोल्यातील अंध मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते . ब्रँड अँबेसिडर डॉ.कोरडे द्वारा या सर्व अंध मतदारांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली . ज्या दिव्यांग मतदारांना 26 एप्रिल रोजी मतदान केंद्रापर्यंत पोहोचायचे आहे त्यांच्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे वाहतूक व्यवस्था उपलब्ध असून ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करून ही सोय निशुल्क उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अरविंद देव यांनी दिली . अंध मतदारासाठी ब्रेल प्रशिक्षणाच्या कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच घेतल्या जातील अशी माहिती कोषाध्यक्ष श्री विजय कोरडे यांनी दिली . ब्रेल लिपी प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य विशाल भोजने, अनामिका देशपांडे, श्रीकांत कोरडे, संजय तिडके, अंकुश काळमेघ, अस्मिता मिश्रा, विवेक तापी, पूजा गुंटीवार व नीता वायकोळे यांनी सहकार्य केले .