भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
तीन मिनिटांत कसा घडला चांद्रयानाचा प्रवास?
लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या पूर्ण
5.34 वाजता : लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली.
पॉवर डिसेंटला सुरुवात!
5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.
रफ ब्रेकिंग फेज पूर्ण
5.56 वाजता : लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात आली, हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.
अल्टिट्यूड होल्डिंग फेज यशस्वी
5.57 वाजता : रफ ब्रेकिंग फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली.
फाईन ब्रेकिंग फेज यशस्वी
5..59 वाजता : फाईन ब्रेकिंग फेजही अगदी आरामात पार पडली. त्यानंतर शेवटची व्हर्टिकल डिसेंट फेज बाकी होती.
ऐतिहासिक क्षण!
6.04 वाजता : चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....