वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : “शासन आपल्या दारी” या उपक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांच्या दारापर्यंत देण्यात येत आहे. रेशीम संचालनालय,नागपूरच्या वतीने राज्यात मनरेगा व सिल्क समग्र 2 अंतर्गत रेशीम प्रकल्पाच्या या दोन योजनेमधून वैयक्तिक लाभ दिला जातो. मनरेगामधील योजनेत लाभर्थ्यांना तीन वर्षापर्यंत आपल्याच शेतात राबवून मजूरी व किटक संगोपन गृह, बांधकाम व इतर साहित्यासाठी कुशलमधून निधी दिला जातो. एक एकर क्षेत्रासाठी ही योजना असून तीन वर्षात 3 लक्ष 58 हजार 115 रुपये मजुरी व साहित्यासाठी देण्यात येतो.
सिल्क समग्र- 2 ही केंद्र पुरस्कृत योजना असुन केंद्राचा 50 टक्के सहभाग, राज्य शासनाचा 25टक्के व लाभार्थी हिस्सा 25 टक्के आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी केंद्राचा 65 टक्के सहभाग राज्य शासनाचा 25 टक्के व लाभार्थी हिस्सा 10 टक्के सहभागाने अनुदान दिले जाते. तुती लागवड, ठिबक सिंचन, रेशीम किटक संगोपन गृह, संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधी या योजनेसाठी प्रामुख्याने अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना सर्व खर्च सुरुवातीलाच करावा लागतो. त्यानंतर प्रस्ताव सादर केल्यावर अनुदान उपलब्धतेनुसार वाटप केले जाते. सन 2023-24 या वर्षात जिल्ह्यातून रेशीम विकास प्रकल्प राबविण्यास 108 शेतकऱ्यांचे 134 एकर क्षेत्रासाठी अर्ज प्राप्त झाले आहे. मनरेगा योजनेतून 52 लाभार्थ्यांना तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. सिल्क समग्र -2 मधील 56 शेतकऱ्यांना 82 एकरसाठी पुर्व संमती देण्यात येत असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी सु.प्र.फडके यांनी दिली.