विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी मुकेश कोठीराम लेंडे (२२, रा. खमारी) याला तीन वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये द्रव दंडाची शिक्षा सुनावली. हा आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी दिला. याबाबत असे की, २० वर्षीय विवाहित महिलेच्या पतीचे खमारी येथे इलेक्ट्रिक दुकान आहे. ती घरकाम करून पतीसोबत दुकानात जात असते. विवाहित महिलेला दोन लहान दीर आहेत. ती आपल्या पतीसोबत वेगळे राहते. दोन्ही दीर व सासू एकत्र राहतात. सासू सासरे व दोन्ही दिरांनी विवाहितेच्या पतीसोबत भांडण केले. १२ एप्रिल २०१७ रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास विवाहिता ही आपल्या पतीसोबत इलेक्टिक दुकान बंद करून घरी आली. तेव्हा आरोपी मुकेश लेंडे व विकेश लेंडे यांनी लोखंडी रॉडने विवाहितेच्या पतीवर मारहाण केली. त्यानंतर विवाहितेच्या पतीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विवाहितेच्या तक्रारीवरून कारधा पोलिसठाण्यात भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एच. आर. इंगोले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासादरम्यान पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार करण्यात आला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना विचारपूस करून आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते. तपासाअंती आरोपीविरुद्ध पुरावे मिळून आल्याने सदर प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष पुराव्याच्या तपासाअंती आरोपी मुकेश कोठीराम लेंडे याला भादंवि ३०७ कलमांमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास २० हजार रुपये द्रव दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली.