वाशिम : महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या अनमोल अशा राज्यघटनेने (संविधानाने) प्रत्येक व्यक्तीला कोठेही किंवा कोणत्याही मतदार संघातून निवडणूका लढविण्याचा नक्कीच अधिकार दिलेला आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीवर डोळा ठेवून आज रोजी,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात, निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक उमेद्वारापेक्षा बाहेरच्याच उमेद्वारांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येत आहेत.ज्याप्रमाणे पावसाळ्यात जिवनोपयोगी पिकापेक्षा जास्त प्रमाणात गाजर गवत वाढते.त्याप्रमाणे बाहेरच्या उमेद्वारांची संख्या येथे वाढत आहे.ज्या उमेद्वाराचे नाव केव्हाही ह्या मतदार संघातील मतदारांनी, सामान्य नागरिकांनी एवढेच काय तर राजकिय पक्षाच्याच कार्यकर्त्यानी कधीकाळी ऐकलेले देखील नव्हते.अशा अनोळखी पाहुण्या व्यक्ती आज एखाद्या पक्षाचे सदस्यत्व घेवून कारंजा मतदार संघावर दावा करीत आहेत.ना त्यांची कारंजा जन्मभूमी आहे ! ना त्यांची कारंजा कर्मभूमी आहे !! ना कारंजा मधील जनतेशी त्यांचे सोयरसुतक आहे ! किंवा ना त्यांचे मित्रत्व आहे !! मात्र कारंजा मानोरा मतदार संघाशी काडीचाही संबंध नसतांनाही अशा अनोळखी व्यक्ती या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची भाषा करीत आमदार होण्याची स्वप्ने रंगवीत आहेत.हेच फार मोठे आश्चर्य आहे ! नव्हे नव्हे कारंजा मानोरा मतदार संघाचे दुर्भाग्य आहे.तसेच यातही हे उमेद्वार जणू काही आपणच या मतदार संघाचे पालनहार किंवा भाग्यविधाते असल्याचे दर्शवून खूप मोठे दानशूर असल्याचा आव आणून मतदार संघात वह्यापुस्तके वाटप, चष्मे वाटप,रोगनिदान शिबीरे व वृक्षारोपण कार्यक्रम घेत,मतदार संघाच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे आमिष दाखविण्याकरीता,भला मोठा आकांत तांडव करीत देखाव्या साठी मोर्चे-पदयात्रा काढीत आहेत.परंतु कमितकमी कारंजा -मानोरा मतदार संघ हा यांच्याशी कोणत्याच प्रकारे संबधीत नसतांना किंवा साधी यांची कर्मभूमी देखील नसतांना येथील जनसमस्या यांना कळणार काय ? किंवा येत्या दोन महिन्याचे आत निवडणूकीपूर्वी मतदार संघाची एखादी तरी समस्या सोडविण्यास हे पाहूणे उमेद्वार समर्थ ठरतील काय ? आणि खरोखरीच ते समस्या सोडवूच शकतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवावेच.असे त्यांना माझे खुले आव्हान असल्याचे ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे.तसेच कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने खालील समस्या मांडल्या आहेत. १) कारंजा या ऐतिहासिक नगरीतील दत्तावतार श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान आणि जगप्रसिद्ध जैन मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या देशविदेशातील भाविकांची संख्या लक्षात घेता या नगरीचा समावेश अ वर्गीय तिर्थक्षेत्र म्हणून करून या नगरीच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करावा. २) कारंजा मानोरा मतदार संघातील सोहोळ काळविट अभयारण्याचा वनविभागाकडून जलद विकास करून सदरहू अभयारण्य पर्यटनासाठी खुले करून, स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात ३) येथील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या व नागरीकांच्या विकासासाठी कारंजा येथे सामाजिक न्याय भवन व शासकीय वस्तीगृह बांधकामाची मंजूरी मिळवून इमारतीचे बांधकाम त्वरीत करावे. ४) येथील विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी उच्च महाविद्यालय,वैद्यकिय महाविद्यालय,विधी महाविद्यालय,अध्यापक महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे. ५) मतदार संघात औद्योगिक वसाहत सुरू करून हजारो श्रमिकांना रोजगार देऊ शकणारा कमित कमी एखादा तरी मोठा उद्योग सुरू करावा. ६) कारंजा ही आशिया खंडातील पहिली बाजारपेठ आहे हे लक्षात घेवून शेती मालावर प्रक्रिया करणारा एखादा मोठा उद्योग आणून स्थानिक शेत मालाला हमीभाव देवून मजूर कामगाराच्या हाताला काम मिळवून द्यावे. ७) येथील लोककलावंता करीता सांस्कृतिक भवन आणि पत्रकारा करीता पत्रकार भवनाची निर्मिती करावी ; समस्यांचा शोध घेणाऱ्या उमेदवारांना माझे खुले आव्हान आहे की,आमच्या मतदारासंघातील या जनसमस्या मधील एखादी तरी समस्या येत्या विधानसभा निवडणूकापूर्वी सोडवून दाखवावी.व नंतरच कारंजा मानोरा मतदार संघावर बिनधास्तपणे आपला दावा करावा.असे आव्हान दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी पाहुण्या उमेद्वारा करीता केले आहे.