अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला द्वारा २८ मे २०२३ रोजी आर एल टी विज्ञान महाविद्यालयात संगीतकार कौशल इनामदार यांची संगीत मैफिल सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित केली होती . संगीतकार कौशल इनामदार यांचा संगीत प्रवास , रसिकांशी संवाद , गीतांची निर्मिती , कवितांची गाण्यासाठी निवड , मालिकांचे शीर्षक गीत गप्पा व गाणी अशा सर्व विषयांचा समावेश असणाऱ्या मैफिलीला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला . सुप्रसिद्ध संगीत समीक्षक प्रा.विशाल कोरडे यांनी या संगीत मैफिलीचे आयोजन व संचालन केले . प्रा.विशाल कोरडे यांचे प्रश्न व संगीतकार कौशल इनामदार यांचे संगीतमय उत्तर अशी जुगलबंदी या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले . प्रारंभी संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिलेला "नदीच्या किनारी नदीला म्हणावे" हा अभंग विलंबित लयीत प्रस्तुत केला . कोणत्याही गद्याला संगीतात बांधता येणे शक्य आहे . फक्त प्रतिभेची आवश्यकता असते असे संगीतकार कौशल इनामदार म्हणाले . विश्वातील सर्वात मोठे गीत "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" आणि या गीताच्या मागील संगीत रचना कशी केल्या गेली ? त्या संदर्भात प्रात्यक्षिकासह त्यांनी माहिती दिली . नवनीत हाती आले रे या जाहिरातीची स्वररचना कशी केली ? त्याविषयी गमती जमती त्यांनी रसिकांना सांगितल्या . बालगंधर्व चित्रपटाला संगीत देताना आलेला अनुभव व त्यासंबंधीची सर्व पार्श्वभूमी त्यांनी उलगडून सांगितली. एवढेच नव्हे तर परवरदिगार या कव्वालीला संगीत येताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले ? यासंबंधी संगीतमय गप्पा केल्या . सर्वांच्या तोंडी असणारे " हीच आमुची प्रार्थना " हे गीत स्वरबध्द करताना जुन्या चित्रपट संगीतातील गीतांचा त्यांना कसा उपयोग झाला ? त्यासंबंधी मनोरंजनात्मक माहिती दिली . ही मैफिल दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ब्रेल बुक्स निर्मितीसाठी समर्पित असल्याने प्रस्तुतीकरण करताना मनस्वी समाधानाची भावना असल्याचे त्यांनी बोलून दाखवले . सदर संगीत मैफिलीला संपूर्ण भारतातून रसिक श्रोतावर्ग उपस्थित होता त्याचबरोबर ग्लींप्स ट्रेझर फोटोग्राफी तर्फे ऑनलाइन पद्धतीने ही मैफिल संपूर्ण विश्वात प्रसारित करण्यात आली . मैफिलीला तबल्याची साथ श्री.सिद्धेश्वर टिकार यांनी केली .गुजरात अंबुजा एक्सपोर्टस लिमिटेड , रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट, पाध्ये कोचिंग क्लासेस व भारती स्टोअर्स अकोला यांनी प्रस्तुत कार्यक्रमात ५० व्हीलचेअर देण्यासाठी सहकार्य करण्याचे घोषित केले त्यातील ५ व्हील चेअर कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात आल्या. यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत कोरडे ,अरुण राऊत ,हेमंतकुमार शाह ,भारती शेंडे,शारदादेवी सत्यनारायण मंत्री ,मंदा सदाशिव रुखणे ,अनामिका देशपांडे ,महेंद्र कोकणे ,पूजा गुंटीवार ,सत्यजित कुचर ,ब्रिजमोहन चितलांगे ,मुकुंद पाध्ये ,ओमकार गांगडे ,विजय कोरडे ,संजय फोकमारे ,विशाल भोजने ,अंकुश काळमेघ ,आम्रपाली बलखंडे ,सुजाता आसोलकर ,स्वरूप तायडे ,मनोज कसूरकर ,सारिका अयाचित ,दिपाली चिकटे ,हिमांशू निमकर्डे ,अनिरुद्ध देशपांडे ,श्वेता धावडे ,अरविंद देव व जान्हवी राठोड यांनी परिश्रम घेतले .