मुलाने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून गर्भवती सुनेला ठार मारून स्वतःच्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला करणारा सासरा बालाजी लाव्हारे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती घरत यांनी जन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे २०२० साली सदरील घटना घडली होती. आरोपी बालाजी याच्या मुलाचा शितल हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. याचा राग बालाजीच्या मनात होता २७ ऑगस्ट रोजी शितल तिच्या आईसोबत फोनवर बोलत असताना सासरा आरोपी बालाजी लव्हारे याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला यावेळी शितल सहा महिन्यांची गर्भवती होती. दरम्यान बालाजीची पत्नी सुवर्णा या सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता बालाजीने तिच्याही पाठीत कुन्हाडीने दोन वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.मयत शितलचे वडील किसन कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले.