गटारे उपसण्याच्या कामाच्या देयकाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमिर्झा ग्रामपंचायतीची सरपंच सोनाली गोकुळदास नागापुरे व सदस्य अजय नागापुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्यास अमिर्झा येथील गटारे उपसून ट्रॅक्टरने मलबा फेकण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामाच्या रकमेच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच सोनाली नागापुरे व सदस्य अजय नागापुरे यांनी संबंधित कंत्राटदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. मात्र लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यानी मंगळवारी(ता.११) सापळा रचून सरपंच व सदस्यास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.