पूजेने शरीराच्या व्याधी दुरुस्त होतात ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. ते ग्रामगीतेत म्हणतात.
भुलू नका चमत्कारा ।
जगी ही थापचि सारी ।।
१९३९ साली वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पाठीला फोड झाला, त्या फोडामुळे महाराज अस्वस्थ होते. अमरावतीचे डाॕक्टरची औषधी चालू होती परंतु फोड फुटतच नव्हता. त्यामुळे महाराजांच्या भक्तांना चिंता वाटत होती. त्यावेळी सुमारे दोन महिने महाराज श्रीमंत दादासाहेब बोके यांच्या बंगल्यावर अमरावतीला आराम करीत होते.
एके दिवशी दादासाहेबांना कुणीतरी सांगितले की, इंदोरला एक वैद्य आहे. तो फारच हुशार आहे. त्याला वैद्यक शास्त्राचे ज्ञान असून मंत्र विद्या त्यास अवगत आहे. तो वैद्य हनुमानाचा फोटो समोर ठेवून, हनुमानाला प्रार्थना करुन इच्छित फळ मिळवितो. म्हणून दादासाहेब बोके यांनी इंदोरला मनुष्य पाठविला. त्या वैद्य यास बोलावून त्यास पाचशे रुपये फी देण्याचे कबूल केले. महाराजांच्या पाठीचा फोड फुटावा व आराम व्हावा हिच बोके यांची आंतरिक इच्छा होती.
त्या राजवैद्दकाने पूजेचा पसारा मांडला. समोर हनुमानाचा फोटो ठेवला. थोडा वेळ डोळे मिटविले. जणू त्याने हनुमानाचे ध्यान केले आणि महाराजांना वैद्य म्हणाला..!
मै जैसा कहुँगा वैसाही आप बोलेंगे, उसके बिना और कुछ नही बोलेंगे, वैसा करनेसे आपको आराम होगा, आपकी तब्येत सुधर जायेंगी ।
राष्ट्रसंत म्हणाले..."ठिक है"
वैद्य बोला....."हे हनुमानजी मेरी सब बिमारी लो और मुझे सुखी करो"
राष्ट्रसंतांनी सारा ढोंग धतुरा ओळखला होता. ते म्हणाले की, "हे हनुमानजी, आपको जो भी बिमारी है, वह मुझे दे दो और सब दुनियाको सुखी करो"
हे ऐकताच तो वैद्य म्हणाला की, ऐसा मत कहो, मै बोलता हूं वही बोलो । पुन्हा वैद्य म्हणाला, "हे हनुमानजी मेरी बिमारी लो, मुझे सुखी करो" असे म्हटले. त्यानंतर राष्ट्रसंत म्हणाले, "हे हनुमानजी आपको जो भी बिमारी है वह मुझे दे दो और सब दुनिया को सुखी करो"
तो वैद्य महाराजांवर रागावला. खूप चिडला पण महाराज शांतच होते. महाराजांनी सारे ढोंग ओळखले होते व त्यांचा अशा उपायांना विरोध होता. पूजेने वा अशी मागणी केल्याने शरिराचे रोग बरे होत नाही हे त्यांना पक्के माहीत होते परंतु लोकप्रवाहावर दबाब न टाकता हे सारे त्यांना थांबवायचे होते.
तो वैद्य रागारागाने उठून गेला व दुसरे दिवशी त्याने पलायन केले. पूजेने शरिराच्या व्याधी बसत नाही. ही अंधश्रद्धा आहे. म्हणूनच महाराज अंधश्रद्धेला विरोध करीत होते.
राष्ट्रसंतांनी पुढे आयुर्वैद शिक्षणाचे वर्ग सुरु केले. वरखेड, आमला विश्वेश्वर, गुरुकुंज येथे आयुर्वैद शिक्षणाची सोय केली. १९५९ साली गुरुकुंज आश्रमात आयुर्वैद महाविद्यालय सुरु केले. अजूनही खेड्यापाड्यातील लोकांना भुलवून काही ढोंगी लोक पूजापातीचा डोंगर उभारत असतात व रोग दुरुस्त करतो असा दावा करीत असतात. वं. राष्ट्रसंतांनी यातील निष्फळता अनेकदा लोकांसमोर आणून दाखविली.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोनः 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....