वाशिम : "गेल्या कित्येक वर्षापासून अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकरी वर्ग पूर्णतः घायाळ झालेला असून, अल निनोच्या संकटाने सन 2023-24 पेरणीची वेळ गेल्यानंतर उशीरा आलेला पाऊस,पुढे पूर स्थितीने वाहून गेलेली पिके,अंदाजापेक्षा कमी झालेले नगदी पिक सोयाबीन,घटलेले तूर वाण, दर पंधरा दिवसांनी तसेच ऐन चैत्रात आणि निवडणूक काळात होणारा अवकाळी पाऊस व वारेवादळ गारपिट. उध्वस्त झालेल्या फळबागा,पालेभाज्या त्यामुळे आधीच कर्जबाजारी व मजबूर असलेला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे.तशाच केन्द्रशासन शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव , पिकविम्याची रक्कम व सरसकट नुकसान भरपाई देत नसल्याची वस्तुस्थिती. कोरोना महामारी पेक्षाही भयावह अशा अस्मानी व सुल्तानी संकट काळात होत असलेली लोकसभा निवडणूक. या लोकसभा निवडणूका बद्दल ग्रामिण भागातील शेतकरी वर्गामध्ये मुळीच उत्साह नसून हतबल झालेला शेतकरी लोकसभा निवडणूकीच्या उमेद्वाराला आपल्या शेतीच्या बांधावर नेण्यासाठी आतुरलेला दिसत आहे. आपल्या गावखेड्यापर्यंत, घरापर्यंत उमेद्वार पोहोचले पाहिजेत अशी आशा बाळगून तो उमेद्वाराची प्रतिक्षा करतो आहे. "कारण स्वातंत्र्या पासून आजतागायत आपण बळीराजा करीता काहीही विकास कार्य केले नाही.गेल्या दहा बारा वर्षापासून असलेल्या आमच्या सोयाबिन, कपाशी सारख्या शेत मालाला आपण भाव वाढवून देऊ शकले नाही. तेव्हा भविष्यात शेतकऱ्या करीता तुम्ही काय करणार ? मजूर कामगारा करीता आपल्या कडे कोणत्या योजना आहेत ? आमच्या पदव्या विभूषित सुशिक्षीत मुलांकरीता आपण चोहीकडे सर्व सरकारी संस्थाचे खाजगीकरण केल्यानंतर सुशिक्षित बेकारांना कोणत्या सरकारी नौकऱ्या देणार आहात ? तसेच मतदार संघातील तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखडा केव्हा मंजूर करणार आहात ?" इत्यादी प्रश्न मतदार संघातील ग्रामिण शेतकरी व ग्रामस्थांना उमेद्वारांना विचारायचे आहेत. परंतु एकही उमेद्वार ह्या तळागाळातील ग्रामिण शेतकरी मतदारांपर्यंत पोहचतच नसल्यामुळे मतदानाबाबत आता हा मतदार संताप व्यक्त करीत असून निरुत्साही दिसत असल्याचे वास्तव आपल्या सर्व्हेक्षणातून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मांडले आहे.