कारंजा : - सध्या अल निनोचा प्रभाव आणि हवामान तज्ञाचे वेगवेगळे अंदाज त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.परंतु शेतकरी वर्ग हा बळीराजा आहे.तो जगाचा पोशिंदा आहे.त्यामुळे त्याने अजिबात घाबरून जाता कामा नये.कारण सध्या मान्सूनला पोषक वातावरण असून, केरळला मान्सून दाखल झालेला आहे. महाराष्ट्रात आणि आपल्या वाशिम जिल्हयात मान्सूनचा पाऊस निश्चितच दि १० ते १२ जूनचे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील आठवड्यात दि. २५ मे २०२३ रोजी सूर्याचा रोहीणी नक्षत्रात प्रवेश झालेला आहे. त्यामुळे हळूहळू वातावरणात बदल होत जाणार असून रोहीणीच्या पाऊसाच्या सरी यायलाच हव्या असतात मात्र वातावरण उष्णतेचे असल्यामुळे कोठे कोरडी वादळे तर काही ठिकाणी भाग बदलत पाऊस सरी येण्याची शक्यता आहे. गुरुवार दि. ८ जून रोजी मृग नक्षत्र प्रारंभ होत असून या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे पाऊसाची वाटचाल हळूवार राहणार असून, १८ जून रोजी शनि कुंभ राशीत वक्री झाल्या नंतरच पाऊसाची खरी वाटचाल सुरू होऊन, मृग नक्षत्राच्या उत्तरार्धापासून पावसाला सुरुवात होईल.
गुरुवार,आषाढी एकादशी दि. २९ जून २०२३ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची भव्य यात्रा असून या यात्रेनंतरच यावर्षी महाराष्ट्रात पेरण्या होतील असा अंदाज आहे.अल निनोचा प्रभाव असल्या कारणाने पाऊस लांबला असल्याची चिन्हे दिसत आहेत . मात्र जुलै महिन्यात पिकांना बहार येईल.यावर्षी कपाशीचा पेरा वाढल्यास शेतकरी राजाला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मंगळवार दि. १८ जुलै २०२३ पासून हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषोत्तम मास किंवा अधिकमास म्हणून ओळखल्या जाणारा अधिक श्रावण प्रारंभ होत असून या काळात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन पाण्याची मुबलकता भरून निघण्याची शक्यता आहे. ज्या ज्या वर्षी अधिकमास असतो ते वर्ष सुख समृद्धीचे असते असा अनेक शेतकऱ्याचा अनुभव आहे. आणि त्यामुळेच एकप्रकारे अल निनोचा प्रभाव पुरुषोत्तम मासामुळे कमी होईल. व पाऊस सरासरीच्या जवळपास निश्चितच होईल मात्र चालू हंगामाचे उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसत आहे. मात्र शेतकरी राजांनो तुम्ही जगाचे पोशिंदे आहात त्यामुळे तुम्हाला मायबाप सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे धैर्याने शेती कामाला सुरुवात करावी.असे वृत्त सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी कळवीले आहे.