वाशीम/कारंजा : स्वातंत्र्य काळापूर्वी लोकमान्य टिळक यांनी श्री गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा पायंडा पाडला होता. त्यामागे महत्वाचा उद्देश जर कोणता असेल तर तो म्हणजे, "वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या सर्व जाती जनजातीच्या समाजाला एकत्र आणणे. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकसंघ आलेल्या समाजाला धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपल्या भारत देशाविषयी जागृत करून त्यांचे समाज प्रबोधन करणे." हा निःस्वार्थ उद्देश लोकमान्यानी आपल्या मनात बाळगलेला होता. श्री गणेशोत्सव हा लहानग्या बाळ गोपाळांपासून तर तरुणाई आणि वृद्ध मंडळी देखील अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करीत असतात. आणि शक्यतोवर श्री गणेशोत्सव मंडळ आपल्या माध्यमातून शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबवून विधायक कार्य करीत असतात. परंतु शासनाने श्री गणेशोत्सवा करीता आचार संहिता तयार केलेली असून शासन निर्देशाचे पालन करणे सक्तीचे केले आहे. आता राहिला नोंदणीकृत मंडळांचा प्रश्न ? तर प्रत्येक नोंदणी कृत मंडळ शासनाचे आदेशाचे तंतोतंत पालन १००% करीत असतात. परंतु काही चिमुकले किंवा शालेय विद्यार्थी देखील मोठ्यांचे बघून, सामुहिक गणेशोत्सवाकरीता पुढे येऊन बाप्पाची स्थापना करीत असतात. त्यामुळे निदान अशा चिमुकल्यांच्या बालहौशी गणेश मंडळां करीता शासनाने आणि मुख्यतः पोलिस प्रशासनाने नियमात शिथिलता द्यायला हवी असते. नव्हे नव्हे ते पोलिस प्रशासनाने बालकांचा उत्साह कायम ठेवण्या करीता करायलाच हवे असे मला तरी वाटते. तसेच श्री गणेशोत्सव मिरवणूकी मधून बहुतांश मंडळे, लेझीम पथक, भांगडा नृत्य, विविध महापुरुषाची वेशभुषा केलेले देखावे करून समाज प्रबोधन सुद्धा करीत असतात . आणि खास करून मिरवणूकीच्या मार्गात येणार्या चौफुल्या किंवा चौका चौकात ते जास्त वेळ पर्यंत आपल्या मंडळाचे सादरीकरण करीत असतात. अशावेळी पोलिस प्रशासनाने थोडी मुभा द्यायला हवी असते. तसेच आजकाल श्री गणेशोत्सवमधून सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मता साध्य करण्याचा प्रयत्न विविध धार्मियांकडून केला जात असतो. त्यामुळे असे विधायक कार्य करणाऱ्या अन्य धर्मियांची सुद्धा शासनाने आपल्या स्तरावर नोंद घेऊन त्यांचा प्रोत्साहन पर गौरव करायला हवा. श्री गणेश उत्सव मंडळाचे संचालक, पत्रकार मंडळी, स्वयंसेवा देणारे निःस्वार्थ स्वयंसेवक यांना शासनाकडून ओळखपत्र, तसेच श्री गणेशोत्सवानंतर यांची दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र द्यायला हवे . त्यामधून निश्चितच शासनाकडून किंवा पोलिस प्रशासनाकडून चांगला संदेश जाऊ शकतो. तसेच मिरवणुकीला सेवा देणारे, त्यांच्या करीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा नास्त्याची व्यवस्था करणाऱ्या समाजसेवी दानशूर व्यक्तिची तसेच श्री गणेशोत्सव मिरवणुकीचे स्वागत करणाऱ्या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या परधर्मियांचे सुद्धा शासन प्रशासनाने कौतुक करायला हवे. शासन प्रशासनाने सुद्धा आपले कर्तव्य पार पाडत असतांना आपणही याच समाजाचा एक घटक आहो हे लक्ष्यात घेऊन समाजासोबत समरस होऊन श्री गणेशोत्सव लोकाभिमुख बनविण्याची जबाबदारी पार पाडायला हवी. विरोधाने विरोध होत असतो जेथे प्रेम सामोपचाराने शिस्तीचे पालन केल्या जाते तेथे जास्त बंधने लादायला नकोत. अपवाद केवळ व्यसनाधिन, चिडीमार, टवाळखोर व्यक्तीचा असू शकतो अशा लोकांकर मात्र प्रशासनाकडून बारीक नजर असायला हवी. कारण ह्या व्यक्ती गव्हामधल्या खड्या प्रमाणे असतात. त्यामुळे हे खडे निवडून काढायलाच हवे असतात. गेल्या दोन अडिच वर्षे ज्याकाळात कोव्हीड 19 कोरोना महामारीने थैमान मांडले असतांना घराघरात बंदिस्त झालेल्या, रोजगाराचे साधन बुडालेल्या, उपासमारीचा सामना करीत असलेल्या, आजारामुळे रक्ता करीता याचना करणार्या रुग्नांना याच समाजाने, याच मंडळांनी, मदतीचा हाथ देत रक्तदानाची शिबीरे आयोजीत करून रक्तसाठा मिळवून दिला. गरजूंना अन्नधान्य, किराणा, पुरीभाजी, दाळ पोळी, झुनका भाकरीची पाकीटे वाटली. तर कुणी जात धर्म न बघता दोन दोन महिने रेशनचे धान्य मोफत दिले. केवळ एवढेच नव्हे तर माणसाविषयी प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती ठेवून अनेक बेवारस (अज्ञात) व्यक्तिंचे,कुणी कुणाचे अंत्यसंस्कार सुद्धा पार पाडलेत. तेव्हा त्यांचे हे सामाजिक कार्य विसरता येणार नाही. कोरोना काळात कुणीही जात धर्म पहात नव्हता . बघीतल्या जात होती ती केवळ मानवता. आणि म्हणूनच शासन आणि प्रशासनानेही मानव सेवा परमो धर्मः हे ब्रिद ऊराशी बाळगून समाजाला आदर देऊन मोकळा श्वास घेऊ इच्छिणाऱ्या श्री गणेशोत्सवाला अविस्मरणिय उत्सव म्हणून मान्यता द्यायला हवी असे आम्हाला वाटते. लेखक : संजय कडोळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त (पत्रकार) अध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा (लाड) जि. वाशिम. मो.9075635338