संपूर्ण विदर्भात दि.२७ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचे अंदाज. गणेशभक्तांनी सतर्क रहावे.
कारंजा (लाड) : सद्यस्थितीमध्ये बंगालच्या उपसागरावर घोंघावणारे चक्रीवादळ आणि उच्च कमी दाबाच्या पटट्यामुळे अरबी समुद्रावरील वातावरणातही कमी दाबाचे वलय निर्माण झालेले असून त्याचा प्रचंड असा भौगोलीक परिणाम संपूर्ण भारतामधील प्रत्येक राज्यात होत असून आज रोजी जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत मोसमी पावसाचा जोर कायम आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा भाग बदलवून पाऊस बरसतच असून त्यामुळे नदीनाल्याला पुरस्थिती निर्माण होऊन राज्यातील धरणे तुडूंब भरल्यामुळे सर्वच धरणामधून नदीपात्रा मध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाद्वारे सन्मानित असलेले जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल पाटील उर्फ गोपाल विश्वनाथ गावंडे,रुई गोस्ता ता.मानोरा यांचेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधत श्री गणेश उत्सवाच्या पर्वावर पावसाचे अंदाज जाणून घेतला सांगितले की,"येत्या दि.२७ ऑगष्ट २०२५ पासून दि. ०३ सप्टेंबर २०२५ पर्यंत हा पाऊस बरसणार आहे. माझ्या अंदाजामध्ये एवढाच फरक राहील की,काही भागात हलक्या बारीक सरी येतील तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होईल. तसेच येणाऱ्या दिवसात काही भागात सोसाट्याचा वारा,ढगांचे प्रचंड गडगडाट,विजाचे लखलखाट होऊन विजा जमिनीवर पडतील." विशेष म्हणजे या संदर्भात अधिक बोलतांना त्यांनी आपण दि ३१ जुलै २०२५ रोजीच साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राद्वारे आपण अंदाज दिले असल्याचे स्पष्ट केले.पुढे बोलतांना त्यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना सांगितले की, "श्री गणेशोत्सवाचे आगमनाचे दिवशी दि. २७ ऑगष्ट रोजी,पूर्व पश्चिम विदर्भातील अनेक ठिकाणी आणि वाशिम यवतमाळ अकोला अमरावती जिल्ह्यात काही भागात दुपारी ०४:०० वाजता आणि रात्री ०७:०० वाजता मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. म्हणून श्री. गणेशमंडळाच्या पदाधिकारी आणि श्रीगणेश भक्तांनी आपआपल्या श्री.गणेशमुर्ती आणण्यासाठी सायंकाळची वाट न पहाता,सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंतच आणून श्री.गणेशमूर्तीची शक्य तेवढ्या लवकर स्थापना करून घ्यावी.कारण त्यानंतर ०४:०० वाजेपासून देवराज इंद्र देवाकडून गणरायाच्या स्वागताला पर्जन्यवृष्टी होणार असून, मुसळधार पावसाचे अंदाज आहेत.तसेच पावसाळा सुरू असल्यामुळे,श्री गणपती बाप्पांच्या मंडपाचे छत पत्र्याचे किंवा ताडपत्री टाकून सुस्थितीत करून घ्यावे.पुढे पाऊस येणार आहे." यावेळी सध्या पावसाळा मध्यावर असून,अद्यापपावेतो परतीचा पाऊस सुरु झाला नसल्याचेही गोपाल पाटील गावंडे यांनी स्पष्ट केले आहे.