गडचिरोली : बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा मृतदेह गावालगतच असलेल्या ( missing girl dead body found ) नाल्यात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरुणी २९ मार्चपासून बेपत्ता होती. आई-वडिलांनी पोलीस मदत केंद्र दामरंचा येथे या तक्रार दिली होती. शोध घेतला जात असताना चक्क तिचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीना येरा सिडाम (रा.मन्नेराजाराम (गेर्रा) ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी जिमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या दामरंचा पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना सिडाम हिचं गावातीलच एका मुलावर प्रेम होतं. हे संबंध घरच्यांनाही मान्य होतं. मुलगी घरून गेल्याने बहुतेक दोघांनी पळून लग्न केले असावे असं मुलीच्या घरच्यांना वाटलं. मात्र, नातेवाईक आणि इकडेतिकडे शोध घेतल्यावर तिचा थांगपत्ता न लागल्याने मुलीच्या आईवडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. घरामागच्या नाल्यात तिचा मृतदेह पुरूल्याचं कळताच ५ एप्रिलला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले.
मुलीचं ज्या मुलावर प्रेम होतं तो मुलगा गावातून फरार असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात चमू तयार करून शोध घेणे सुरू आहे. याबाबत दामरंचा पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतिक्रिया:-
मीना सिडाम ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार होती. मात्र, तिचा मृतदेह गावालगत नाल्यात पुरलेला आढळून आला. तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ५ एप्रिलला शवविच्छेदन करण्यात आले. त्या मुलीचा एका मुलावर प्रेम होतं असं प्राथमिक माहिती आहे. मुलगा सध्या गावात नाही. तो फरार आहे. पथक तयार करून शोध घेणे सुरू आहे. सध्या गुन्हा दाखल केला आहे. नेमकं त्यानेच असं केलंय की दुसऱ्यांने केलंय त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. त्याला अटक केल्यावरच सर्व माहिती समोर येणार आहे.