कारंजा : कारंजा शहरातील श्री गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक जय बजरंग व्यायाम शाळा, लोकमान्य व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, महाराणा प्रताप व्यायाम शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस व्यायाम शाळा, विर भगतसिंग व्यायाम शाळा, श्री नागनाथ व्यायाम शाळा, विर अभिमन्यु व्यायाम शाळा, वाल्मिकी गणेश मंडळ, श्री गुरुनानक गणेश मंडळ, झाशी राणी गणेश मंडळ, कै अण्णाभाऊ साठे गणेशोत्सव मंडळ, विर लहुजी वस्ताद गणेश मंडळ, जिजामाता गणेश मंडळ इत्यादी श्री गणेशोत्सव मंडळे, श्री बाप्पाचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपण्याकरीता करतात हे कारंजाचे वैशिष्टय आहे. श्री गणेशोत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सामान्य ज्ञान, लोककला, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे विविध आरोग्यशिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपणा सारखे कार्यक्रम घेतले जातात. दहा दिवस पर्यंत सायंकाळी महाआरती नंतर लेझिम, भांगडा, गरबा खेळल्या जातो. श्री गणेशोत्सवाच्या दिवसात घरोघरी, मंडळामध्ये महाप्रसादाचे कार्यक्रमाद्वारे अन्नदान केले जाते. अखेरच्या दिवशी प्रशासनाने विसर्जनाची तारीख ठरवून दिल्या प्रमाणे, प्रत्येक मंडळाचे श्री गणेश एका रांगेत प्रमुख विसर्जन मार्गाने सार्वजनिक मिरवणूक काढतात. आणि प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करतात. अतिशय शिस्तशिर निघणार्या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक, भांगडा पथक , विविध वेशभूषेतील कलावंत आपला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. शिवाय या दिवशी श्री गणेशोत्सव मंडळाचे स्वयंसेवक, पोलिस पथक, शांतता कमेटीच्या सदस्यांना शांतता, सलोख्या करीता सहकार्य करून कारंजा शहरातील श्री गणेशोत्सव आनंद व उत्साहात साजरा करतात. शिवाय या श्री गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये व्यापारी, सामाजिक संघटना इत्यादी, ठिकाठीकाणी पिण्याचे पाणी,चहापान, ऊसळ, अल्पोपहाराची व्यवस्था करतात . श्री गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये हिंदु मुस्लिम सर्वधार्मियाचे सहकार्य मिळते. आणि मिरवणूक मार्गात मुस्लिम धर्मीय सामाजिक कार्यकर्ते फुलाच्या पाकळ्याची उधळण आणि श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार सुद्धा करतात . अशा आनंद सोहळ्याने आणि सामजस्याने कारंजा शहरातील श्री गणेशोत्सव साजरा केल्या जातो असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे .