ओबीसी समाजाच्या अस्तित्व आणि अधिकारावर गदा आणणाऱ्या दोन सप्टेंबरच्या काळ्या जीआरविरोधात येत्या १० ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या ओबीसी महामोर्चासाठी गांगलवाडी-आवळगाव-मूडझा जिल्हा परिषद सर्कलमधील ओबीसी बांधवांनी एकजुटीचा निर्धार केला आहे. या संदर्भातील नियोजन बैठक ७ ऑक्टोबर ला ग्रामपंचायत भवन आवळगाव येथे ओबीसीचे प्रभाकर सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला कॉ. विनोद झोडगे, प्रमोद चिमुरकर आणि सुरेश बुरडे सर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी वक्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दोन सप्टेंबरचा काळा जीआर हा ओबीसी समाजाच्या अस्तित्वावर आघात करणारा असून, तो तातडीने रद्द केला पाहिजे. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबली पाहिजे आणि ‘ज्यांची जितकी संख्या भारी, त्यांची तितकी भागीदारी’ अशी तत्त्वाधिष्ठित न्यायव्यवस्था देशात प्रस्थापित झाली पाहिजे.”
बैठकीदरम्यान ओबीसींची जातीनिहाय जनगणना, समाजातील प्रतिनिधित्वाचे योग्य विभाजन आणि शासकीय धोरणांतील अन्यायकारक हस्तक्षेप थांबविणे या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. मार्गदर्शकांनी सांगितले की, “आज आपण एकत्र आलो नाही, तर उद्या आपली पुढील पिढी अस्तित्वाच्या संकटात येईल. म्हणून आजच ओबीसी समाजाने आपल्या हक्कासाठी एकवटले पाहिजे आणि नागपूरच्या महामोर्चातून आपल्या ताकदीचा आवाज दाखविला पाहिजे.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी *“जय ओबीसी – जय संविधान! ओबीसी एकता – जिंदाबाद!”*. अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. जवळपास २० गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते आणि प्रत्येकाने एकमुखाने ठरविले की, मी येणारच, पण माझ्यासोबत दहा जणांना घेऊन येणार.
ही बैठक केवळ नियोजनाची नव्हती, तर ती ओबीसी एकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. नागपूरच्या महामोर्चातून ओबीसी समाज आपला इतिहास नव्याने लिहिणार आहे. अन्यायाच्या काळ्या छायेतून मुक्तता आणि सामाजिक न्यायासाठीचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या जनमानसाला जागविणारा ठरणार आहे.या बैठकीचे संचालन नानेश्वर झरकर तर आभार सरपंच प्रीतम बाबनवाडे यांनी मानले.