शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रीतेश लोहकरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी विकी उर्फ अवनीश रेड्डी यास अटक करण्यात आली असून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना नागपूर येथील रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रितेश चा मृतदेह हा मानवी वस्ती पासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना जवळच्या एका पानठेला चालकाने बघितली. हत्येचा थरार बघून तो घाबरून तिथून पळून गेला. या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सदर पणठेला चालकास सुद्धा ताब्यात घेऊन घटनेची शहानिशा केली. तेव्हा त्याने एका तरुणाने लाकडी दंड्याच्या साह्याने त्याच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचे सांगितले.
पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. सदर तरुण हा कृषी महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर आरोपी विकी उर्फ अमिनेश रेड्डी हा पर राज्यात पळून जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर गेला होता. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान आरोपीचा वडील हा अवैध दारू विकत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.