कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): सूर्यनारायण प्रचंड आग ओकत असतांना,मंगळवारी वातावरणात अगदी वापशा असल्याप्रमाणे प्रचंड उष्णता जाणवत होती. घामाच्या धारा वाहत होत्या. याच्या परिणामाने बळीराजाच्या शेतातील अंकुरलेली बिजे नष्ट होऊन, शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येणार हे स्पष्ट दिसत आहे.गेल्या महिन्याभरा पासून बळीराजा आभाळाकडे टक लावून पहात असतांना मात्र, मंगळवारी दि 3 जुलै रोजी सायंकाळी 04:00 वाजता दमदार पाऊस बरसला.त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या पावसाने मात्र कारंजा नगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पाडले असून,रामा सावजी चौक,बजरंग पेठ संभाजी चौक,दिल्ली वेश,जयस्तंभ चौक, डॉ आंबेडकर चौक येथील रस्त्यावर पाणी साचल्याने,अक्षरश: रस्त्याला नदीनाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पावसाच्या आगमनाने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत होते असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे .