सोन्याला आपली चमक दाखविण्यासाठी नेहमीच अग्नीदिव्या मधून तावून सलाखून निघावे लागते.अगदी अशाच प्रकारे मानवी जीवन असते. जीवनाच्या वाटेवर जन्माला आल्यापासून तर अगदी अखेरपर्यंत मानवाला संघर्ष करीत आपली पाऊलवाट पुढे काढावी लागत असते.या संघर्षामध्ये जी व्यक्ती यशस्वी ठरते ती ध्येयवेडी व्यक्ती निरंतर जनमाणसाच्या हृदयपटलावर अधिराज्य करीत असते.असेच आमच्या मधील एक व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथभाऊ पवार. एकनाथ पवार हे बालपणा पासूनच जिद्दी आणि हट्टी स्वभावाचे होते.एखादी गोष्ट मनात ठरवीली की ध्येयप्राप्तीपर्यंत सोडायची नाही. हा त्यांचा स्वभाव.त्यामुळे संघर्षाशी दोन हात करता करता नकळतपणे त्यांची वाटचाल समाजकार्याकडे केव्ही वळली ? त्याचे कोडे त्यांनाच उमगले नाही. आज ते अविरतपणे समाज कार्यात व्यस्त असून वैदर्भिय नाथ समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखले जातात.दि.13 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवन गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा माझा अल्पसा मानसं........ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या म्हणीला सार्थ ठरवीत,एकनाथ पवार बालवयात जे डी चवरे विद्या मंदिर कारंजा ह्या नामांकित शिक्षणसंस्थेत शिकत असतांनाच त्यांनी आपल्यामधील व्यक्तिमत्वाची चुणूक दाखवीली. प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे झालेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवात त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनावरील पोवाड्याचे यशस्वी गायन करून,समाजाला सामाजिक समता प्रबोधनाचा संदेश देवून त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले.त्यामुळे शाळेतर्फे त्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला होता.पुढे त्यांच्या या पोवाड्याचे प्रसारण पुणे दूरदर्शन केन्द्राच्या किलबील आणि बालचित्रवाणी कार्यक्रमामधून करण्यात आले होते.आपले महाविद्यालयीन शिक्षण आटोपून एकनाथ पवार यांनी समाजसेवेकरीता व्यासपिठ मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. एव्हाना त्यांच्या सेवाव्रती कार्यामुळे समाजात त्यांचा चांगलाच नावलौकिक वाढला होता . त्यामुळे संभाजी बिग्रेडच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. संभाजी ब्रिगेडची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांच्या मधील कलाकार जागा होऊन त्यांनी स्थानिक मुल्जिजेठा हायस्कूलच्या भव्य प्रांगणात "रायगडाला जेव्हा जाग येते" ह्या महानाट्याचा हाऊसफुल्ल प्रयोग घेतला. याच काळात सन 2003 मध्ये एसटी महामंडळात अनुकंपा तत्वावर त्यांना वाहक पदाचा आदेश मिळाला. परंतु स्वाभिमानी बाण्याचे एकनाथ पवार यांना गुलामगिरी प्रमाणे कुणाच्या अधिपत्याखाली चापलूसी करणे जमले नाही व अखेर त्यांनी 2012 मध्ये नोकरीचा स्वेच्छेने राजिनामा दिला. दरम्यान त्यांच्या कुटुंबात बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. परंतु आपल्या बाणेदारपणाने त्यांनी आलेल्या संकटावर लिलया मात केली. स्वतः तावून सुलाखून निघाल्याच्या अनुभवातून त्यांनी आपल्या भटक्या समाजाला त्यांचे न्याय्यहक्क मिळवून देण्याकरीता उर्वरीत आयुष्य समाजाकरीता वेचण्याचे ठरवीले. त्यातूनच मग सन 2018 साली "वैदर्भिय नाथ समाज संघाची" मुहूर्तमेढ उभारून या संस्थेद्वारे आपल्या समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता राज्यस्तरिय आंदोलन केले. तसेच त्यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून,महाराष्ट्र शासनाचे तत्कालिन राज्यमंत्री मा.श्री. बच्चुभाऊ कडू यांनी मंत्रालयात स्वतःचे दालनात दोन बैठकी लावून नाथ समाजाच्या काही मागण्या सोडवील्या. याचे सर्वस्वी श्रेय एकनाथभाऊ पवार यांनाच जाते.याशिवाय आता एकनाथभाऊ पवार हे समाजाच्या कल्याणाकरीता 1) नाथ समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात सामिल करण्यात यावे. 2) नाथ समाजोन्नतीकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. 3) प्रत्येक जिल्ह्यात नाथ सामाजिक भवन स्थापन करण्यात यावे. 4) "गोरखधंदा" ह्या पवित्र शब्दाचा वापर करण्यास माध्यमावर बंदी आणावी. इत्यादी मागण्यासाठी उपोषण-धरणे आंदोलन इत्यादी द्वारे लढा देत आहेत.शिवाय समाजाच्या न्यायहक्क,आंदोलनं प्रबोधनाकरीता व आपसी संपर्काकरीता त्यांनी " साप्ताहिक : नाथांजली" नियतकालिक सुरू केले.परंतु समाज कार्याचा एवढा प्रचंड व्याप सांभाळतांना त्यांच स्वतःच्या घरदार प्रपंचाकडे साहजिकच थोडफार दुर्लक्ष होत असल्याने घरादारावर तुळशीपत्र वाहील्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. परंतु त्यांच्या संसाराला यशस्वी साथ देणारी सुविद्य अर्ध्यांगीनी सौ.पुनम आणि मुले चिं.श्री व कु. संस्कृती यांची मिळणारी मोलाची खंबीर साथ असल्यामुळे दिवसेंदिवस एकनाथभाऊ पवार यांचा समाजाला न्याय मिळवून देण्याचा लढा यशस्वी होत आहे. *लेखक : संजय कडोळे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) अध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा (लाड) जि.वाशिम. मो. 9075 635338*